लग्नाचा आनंद बदलला दु:खात
भुवनेश्वर : नव्या आयुष्याची आनंदाने सुरुवात होण्याआधीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वऱ्हाड्यांच्या बसचा भीषण अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं अगदी एका क्षणात झालं. दोन बसच्या भीषण धडकेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 20 लोक जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही धक्कादायक घटना ओडिसा इथल्या गंजम जिल्ह्यातील दिगपहांडी पोलीस ठाणे क्षेत्रात घडल्याची माहिती मिळाली आहे. खेमुंडी कॉलेज जवळ दोन बसचा भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तातडीनं बचावकार्य सुरू केलं.
हा अपघात इतका भयंकर होता की 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना बरहामपुर एमकेसीजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) माहिती दिली की ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गंजाम जिल्ह्यातील बस अपघातात लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे आणि मृतांना तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.