जयपूर, 14 जुलै : राजस्थानमध्ये राजकीय भूकंप घडवण्यासाठी सचिन पायलट यांनी बंड पुकारले खरे पण, आता त्यांना या बंडामुळे चांगलाच दंड पडला आहे. काँग्रेसने त्यांच्यावर थेट कारवाई करत उपमुख्यमंत्रिपदावरुन बाजूला हटवले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी 3 मंत्र्यावर कारवाई केली आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांना काँग्रेस युथच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुनही हटवले आहे. त्यांच्या जागी आता गोविंद सिंह डोटासरा यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. सचिन पायलट यांच्यासह 3 मंत्र्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्याआधी सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी राहुल गांधी यांच्यापासून ते अहमद पटेल यांनी सर्वांनी प्रयत्न केले. पण, सचिन पायलट हे अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता मनधरणीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. अखेरीस पायलट यांनी गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन कधी हटवणार आणि आपल्याला कधी मुख्यमंत्री करणार असं आश्वसान तरी द्यावं, अशी शेवटची मागणी पक्षाकडे केली. पण, पक्षाने त्यांना सीएलपीच्या बैठकीला जाण्याचा सल्ला दिला. तसंच या बैठकीनंतर गहलोत यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. पण, पायलट यांनी बैठकीला जाण्यास नकार दिला. दरम्यान, रविवारी रात्रीपासून राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी वारंवार फोनवर संवाद साधला. प्रियांका गांधींनी सचिन पायलट यांच्याशी 4 वेळा फोनवर संवाद साधला. तर काँग्रेसचे चाणक्य असलेले अहमद पटेल यांनी 15 वेळा फोन करून पायलट यांची मनधरणी केली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी जवळपास 6 वेळा तर केसी वेणुगोपाल यांनी सचिन पायलट यांच्यी 3 वेळा चर्चा केली. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी चर्चा केल्यानंतरही पायलट आपल्या भूमिकेवर मात्र ठाम राहिले. अखेर आता पायलट यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप आता राजकारणात सक्रीय झाली आहे.