नांजैया श्रीनंजैय्या
म्हैसूर, 18 जुलै : छंद जोपासणं प्रत्येकाला जमतंच असं नाही; पण मनाच्या शांततेसाठी ते आवश्यक असतं असं तज्ज्ञ सांगतात. छंद कोणत्याही प्रकारचे असू शकतात; मात्र चिकाटीनं तो जोपासणं आणि ती आवड वृद्धिंगत करणं क्वचितच एखाद्याला जमतं. म्हैसूरमधल्या एका प्राध्यापकांनी त्यांचा असा खास छंद जोपासला आहे. विशेष म्हणजे या छंदाद्वारे ते आपल्या संस्कृतीचंही जतन करत आहेत. नांजैया श्रीनंजैय्या हे म्हैसूर विद्यापीठात लोकसाहित्याचे प्राध्यापक आहेत. कर्नाटकच्या दक्षिणेकडे असलेल्या चामराजनगर जिल्ह्यात ते राहतात. या जिल्ह्याचं आधीचं नाव अरिकुटारा असं होतं. या जिल्ह्याच्या सीमा तमिळनाडू आणि केरळ राज्याला लागून आहेत. भारतासारख्या अनेक लोकसंस्कृतींनी भरलेल्या या देशात लोकसाहित्य, लोककथा शिकवण्याचं काम गेली अनेक वर्षं ते करत आहेत. त्यांना त्यांचा हा विषय अतिशय आवडतो, इतका, की त्यांनी लोकसंस्कृतीच्या खुणा जपणाऱ्या अनेक गोष्टी त्यातून गोळा केल्या आहेत.
न्यूज 18 कन्नड डिजिटलच्या वृत्तानुसार, त्यांच्या खोलीमध्ये त्यांनी अशा वस्तूंचं जतन केलं आहे. म्हैसूर विद्यापीठातल्या कन्नड स्टडी सेंटरमध्ये त्यांची खोली आहे. त्यांच्या संग्रहामध्ये मातीचं भांडं, तांब्याचं भांडं, बीकर स्केल (कानडी भाषेत सेरू, पावू आणि चाटकू असं म्हणतात), मातीचा दिवा अशा काही वस्तू आहेत. सध्या या वस्तू दुर्मिळ झाल्या आहेत; पण श्रीनंजय्या यांनी आपल्या खोलीत या गोष्टींचा अप्रतिम संग्रह केला आहे. या संग्रहामुळे त्यांची खोली गावाचा इतिहास असणाऱ्या संग्रहालयासारखी दिसते. त्यांच्या पुरातन वस्तूंच्या ठेव्याबाबत ते आलेल्या पाहुण्यांना माहितीही देतात. या संग्रहालयात डामरुगा (हिंदीमध्ये डमरू, दोन बाजू असलेले ड्रम) आणि डोल्लूसारखी (मूळ कर्नाटकचं असलेलं एक तालवाद्य) वाद्यंदेखील आहेत. डोलू वाजवल्यावर गडगडाटासारखा आवाज येतो. श्रीनंजय्या यांनी स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा संग्रहही केला आहे. त्यात विविध प्रकारच्या विळ्या, धान्य दळण्यासाठी वापरण्यात येणारी दगडी जाती, बैलगाडीची चाकं, लाकडी पाळणे इत्यादींचा संग्रहसुद्धा आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ओनाके (मुसळ), फायबर सॅक पिशवी आणि ताक घुसळण्यासाठी वापरण्यात येणारं पारंपरिक साधनही ठेवलं आहे. या संग्रहात त्यांनी काही चित्रं व फोटोही जतन केले आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटोही आहे. उत्सवांमध्ये तोंडावर घालण्यात येणारे कही मुखवटेही भिंतीवर लावलेले आहेत. मात्र, त्या मुखवट्यांची व ते कोणत्या सणांवेळी घालतात, याची माहिती उपलब्ध नाहीये. हे सर्व जतन करतानाच त्यांची सुरक्षितता व स्वच्छताही त्यांनी सांभाळली आहे. त्यांचा हा छंद पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.