अनोखी प्रेमकहाणी
रांची/हजारीबाग : झारखंड हे राज्य सध्या एका अनोख्या प्रेमकहाणीमुळे चर्चेत आलं आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे, असं म्हटलं जातं. ही प्रेमकहाणी म्हणजे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. पोलंडमधली 49 वर्षांची एक महिला भारतातल्या झारखंड राज्यातल्या एका छोट्याशा गावातल्या 35 वर्षांच्या युवकाच्या प्रेमात पडली आहे. इन्स्टाग्रामवरून झालेल्या त्यांच्या ओळखीचं आता प्रेमात रूपांतर झालं असून, त्याला भेटण्यासाठी ती आपल्या मुलीला घेऊन त्याच्या गावात आली आहे. इतकंच नव्हे, तर ते दोघं लग्न करणार असून, ती त्याला पोलंडला घेऊन जाणार आहे. प्रेमाला कशाचंच बंधन नसतं, हेच खरं! या अनोख्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेऊ या. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. झारखंड राज्याच्या हजारीबाग जिल्ह्यातल्या बरतुआ गावात शादाब मलिक हा 35 वर्षांचा युवक राहतो. तो पेशाने नर्तक असून, देशातल्या अनेक शहरांत त्याचे नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत. मरहूम शाहूद मलिक हे त्याच्या वडिलांचं नाव. शादाबच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला असून, चार भावंडांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक आहे. त्याच्या दोन्ही बहिणींचा विवाह झाला असून, त्याचा विवाह अद्याप झालेला नाही.
2021मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शादाबची पोलंडमधल्या बार्बरा पोलाक या 49 वर्षीय महिलेशी ओळख झाली. त्या ओळखीचं नंतर मैत्रीत आणि मग प्रेमात रूपांतर झालं. त्यानंतर बार्बराला शादाबला भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. आता तिला भारतात येण्याचा पाच वर्षांचा टुरिस्ट व्हिसा मिळाला असून, त्यामुळे ती लगेचच भारतात येऊन बरतुआ गावात दाखल झाली. आपल्या सहा वर्षांच्या मुलीलाही ती सोबत घेऊन आली. कोणी तरी गोरीपान परदेशी बाई आपल्या गावात आल्याचं पाहून गावकऱ्यांना आधी काहीच कळलं नाही. ती शादाबच्या घरी राहायला आली आहे, हे कळल्यावर त्यांना आश्चर्यच वाटलं. मग त्यांना त्यांची ‘इन्स्टाग्राम स्टोरी’ कळली. बरतुआ गावात जाण्यापूर्वी बार्बरा काही दिवस हजारीबागमधल्या एका हॉटेलमध्ये राहत होती. त्यानंतर ती गावात आली; मात्र तिथे उकाड्याने तिचा जीव हैराण झाला. त्यामुळे तिने शादाबच्या घरात दोन एसी बसवून घेतले आणि एक कलर टीव्हीही घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोणत्याही भारतीय स्त्रीप्रमाणे तिने आल्या-आल्या घराची सगळी जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. गायींचं शेण काढण्यापासूनची घरातली सगळी कामं बार्बरा अगदी खुशीने करत आहे. शादाबच्या प्रेमात ती आकंठ बुडाली आहे. शादाबच्या म्हणण्यानुसार, बार्बराचं पोलंडमध्ये स्वतःचं घर आहे. गाडी-बंगला असं सारं काही आहे आणि तिथे ती काम करते. सध्या गावात त्या दोघांच्या विवाहाची गडबड सुरू आहे. विवाह होण्याआधीच शादाबने बार्बरा आणि तिच्या मुलीला आपलं नाव दिलं आहे. मुलीचं नाव अनन्या असून, ती आतापासूनच शादाबला डॅड असं संबोधू लागली आहे. या दोघांच्या प्रेमकहाणीवरून गावातल्या काही जणांनी नाकं मुरडली असली, तरी बहुतांश जण खूश आहेत. अनेक जण बार्बराला भेटायला त्यांच्या घरी येत आहेत. अनेकांनी शादाब-बार्बराला आपल्या घरी बोलावलं आहे. ‘आम्ही लवकरच लग्न करणार असून, बार्बरा आणि मुलगी अनन्या यांच्यावर मी खूप प्रेम करतो. बार्बराचं वय माझ्यापेक्षा जास्त असलं, तरी त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. कारण प्रेमात वयाचा अडसर येऊ शकत नाही,’ असं शादाब म्हणतो. केवळ शादाबसाठीच भारतात आलेल्या बार्बराला भारत आवडला असून, इथे आल्यावर तिला सेलेब्रिटी झाल्यासारखं वाटत असल्याचं ती म्हणाली. कारण प्रत्येक जण तिला भेटायला, तिच्याशी बोलायला उत्सुक आहे. शादाबशी प्रत्यक्ष भेट झाल्यामुळे ती खूश आहे. सध्या पाकिस्तानातून लपूनछपून भारतात आलेल्या सीमा हैदरची बातमी चर्चेत आहे. त्यामुळे एक परदेशी महिला बरतुआ गावात आल्याची बातमी कळताच डीएसपी राजीव कुमार यांनी तिची भेट घेऊन संवाद साधला. तेव्हा बार्बरा आणि शादाबने त्यांना आपली प्रेमकहाणी सांगितली. टुरिस्ट व्हिसावर असल्याने काही दिवसांनी आपण मायदेशी परतणार असल्याचं तिने सांगितलं. सध्या ती शादाबचा व्हिसा मिळवण्याच्या तयारीत आहे. त्याला पोलंडला घेऊन जाऊन तिकडे आनंदात संसार करण्याचा तिचा मानस आहे.