सीमा हैदरची एटीएसकडून चौकशी
मुंबई, 23 जुलै : सचिन मीणा या भारतीय नागरिकाच्या प्रेमात पडलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली. याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएस सीमाची कसून चौकशी करत आहे. सीमा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयची गुप्तहेर असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. एटीएसच्या तपासादरम्यान सीमा हैदर आजारी पडली आहे. याआधी शुक्रवारी सीमा हैदरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका केली आहे, तसंच आपल्याला चार मुलांसोबत ग्रेटर नोएडामधला आपला साथी सचिनसोबत राहण्याची परवानगी द्या, अशी मागणीही सीमाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील एपी सिंह यांनी सीमाच्या वतीने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली आहे. ही दया याचिका राष्ट्रपती सचिवालयाला प्राप्त झाली आहे. या याचिकेत 30 वर्षांच्या सीमाने आपलं ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या 22 वर्षांच्या सचिनवर प्रेम आहे, त्यामुळे आपण भारतात आल्याचं म्हणलं आहे. एवढच नाही तर आपण हिंदू धर्मही स्वीकारला आहे, असा दावा तिने केला आहे. नेपाळच्या काठमांडूमधल्या पशूपतीनाथ मंदिरामध्ये आपण हिंदू रिती-रिवाजांनुसार सचिनसोबत लग्न केल्याचंही सीमा म्हणाली आहे. यूपी एटीएसच्या तपासावेळी सीमा आजारी पडली असून तिला ग्रुकोज ड्रीप देण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे. आपल्याविरुद्धच्या बातम्या ऐकल्यामुळे आजारी पडल्याचा दावा सीमाने केला आहे. ‘लोक माझ्याबद्दल चुकीचं का बोलत आहेत? यामुळे दु:ख होतंय. कुणीही एकदाही माझ्याबद्दल चांगलं बोललेलं नाही. मी आणि माझी चार मुलं भारतावरचं ओझं वाढवू, असं मला वाटत नाही. जर मला नागरिकत्व मिळालं, तर मी एक चांगली व्यक्ती बनून दाखवीन, मी विश्वासघात करणार नाही,’ असं सीमा हैदरने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. सीमा हैदर पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहते. 2019-20 साली पबजी हा ऑनलाईन गेम खेळत असताना आपण सचिनच्या संपर्कात आलो, यानंतर आमच्यात व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली, असं सीमा सांगत आहे. 13 मे ला सीमा आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. ग्रेटर नोएडामध्ये ती सचिनसोबत राहत होती. 4 जुलैला सीमाला अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तर सचिन मीणाला अवैध प्रवाशांना शरण दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या दोघांनाही 7 जुलैला स्थानिक न्यायालयाने जामीन दिली. सीमा हैदर सध्या चार मुलांसह नोएडामधल्या रबूपुरा भागातल्या घरात राहत आहे.