नवी दिल्ली, 23 मे: देशाच्या राजकारणात जेव्हा नरेंद्र मोदींनी पाऊल टाकले तेव्हापासून भारतीय जनता पक्षाने प्रत्येक वेळी ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. 2014 मध्ये भाजपने प्रथम स्वबळावर सत्ता स्थापन केली. आता 2019मध्ये मोदी त्सुनामीमध्ये पुन्हा एकदा भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मोदींचा 2019मधील हा विजय इतका मोठा आहे की अशी कामगिरी 1984मध्ये राजीव गांधींना देखील करता आली नाही. लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. दुपारी 4 पर्यंत आलेल्या कलानुसार भाजने स्वबळावर 272चा सत्तास्थापनेचा आकडा गाठला आहे. इतक नव्हे तर ते 300 पेक्षा जास्त जागांवर जिंकतील असे दिसत आहे. 2014मध्ये मोदी लाटेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता 2019मध्ये मोदी त्सुनामीत भाजप मोठा विजय मिळवत आहे. मोदींच्या या विजयासमोर राजीव गांधींचा 1984चा ऐतिहासिक विजय देखील फिका पडेल. राजीव गांधींनी मिळवलेला विजय भारतीय राजकारणातील सर्वोच्च शिखरावरचा मानला जातो. भाजप 2014मधील स्वत:च्या 282चा विक्रम मागे टाकत असल्याचे दिसत आहे. केवळ जागाच नव्हे तर भाजप मतांच्या टक्केवारीचा विचार करता भाजप 50 टक्केपेक्षा अधिक मते मिळवेल असे दिसते. भाजपने केलेला हा असा विक्रम आहे जो स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणाला करता आला नाही. सर्वाधिक मतांची टक्केवारी मिळवण्याचा विक्रम राजीव गांधी यांच्या नावावर आहे. 1984मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्यांनी देशात एकतर्फी विजय मिळवला होता. काँग्रेस पक्षाने तेव्हा 48.1 टक्के मतांसह 400हून अधिक जागा जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे तेव्हा भाजपची स्थापना होऊन चार वर्षे झाली होती आणि त्यांना 7.4 टक्के मते मिळाली होती. VIDEO : भाग भाग..शेर आया शेर!