प्रशांत लीला रामदास, बागपत, 4 एप्रिल : महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आहे, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात पश्चिम उत्तर प्रदेश आहे. या दोन्ही प्रदेशातील समानता म्हणजे उसाची शेती. साखरेचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशामध्ये राजकारण देखील साखरेच्या मुद्द्यावर होते. बागपत हा लोकसभा मतदारसंघ माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या कर्तृत्वासाठी ओळखला जातो. साखरेचा प्रदेश मी जेव्हा या लोकसभा मतदारसंघांमध्ये 2019 च्या निवडणुकीचे वारे कोणाच्या दिशेने वाहत आहे हे हे समजण्यासाठी पोचलो तेव्हा मला जे दिसले ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. बागपत लोकसभा मतदारसंघांमध्ये मुजफ्फरनगर जिल्ह्यातील काही विधानसभांचा समावेश होतो. हा संपूर्ण भाग हिरवळीचा आहे, शेतात उभा ऊस आणि डौलदार गव्हाचे पीक पहायला मिळते. सध्या एप्रिल महिना सुरू आहे शेतातील उसाची कापणी सुरू आहे. झारखंड मधून आलेले कामगार ऊस कापनीत गुंतले आहे त्यांना राजकारणाशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त रात्रीच्या जेवणाची चिंता आहे. जाट-मुस्लिम-दलित भर दुपारी संपूर्ण कुटुंब शेतात उसाची कापणी करत आहे,असं काहीसं चित्र आपल्याला सर्वत्र पहायला मिळेल. सोबतच प्रत्येक शेताच्या बाहेर गुळ तयार करणारे झोपडीवजा कारखाने पहायला मिळतात. जाट-मुस्लिम-दलित यांची मोठी संख्या या लोकसभा मतदारसंघात आहे. ज्याप्रमाणे समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांनी आघाडी तयार केली आहे त्यातून या तीनही समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न या पक्षांनी केली आहे. हे तिन्ही समाज ज्या उमेदवाराच्या मागे उभे राहतील त्याचा विजय निश्चित आहे. मोदी लाट आहे? मात्र 2014 मध्ये पहायला मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट यावेळी मात्र पहायला मिळत नाही, हे ही अतिशय महत्त्वाचं आकलन या निमित्ताने आपल्याला करावे लागेल. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक उमेदवार हा फक्त मोदींच्या नावे मत मागत आहे, मोदीला पंतप्रधान करायचे आहे त्यामुळे शंभर टक्के मत भाजपलाच द्या असे आवाहन बागपतचे उमेदवार व केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉक्टर सत्यपाल सिंग देखील करीत आहे. लोकदलाचा प्रभाव दिवसभर जवळपास सतरा गावांमधून फेरफटका मारतांना आणि उमेदवारांच्या प्रचार अभियानात सहभागी झाल्यानंतर जी काही धडधड हाताशी लागली ती मांडताना म्हणावे लागेल की सध्यातरी लोकदलाला बऱ्यापैकी पाठिंबा यावेळी मिळत आहे. दुसरीकडे अजित सिंग देखील माझी शेवटची निवडणूक आहे असे आवाहन करुन प्रत्येक जाट व्यक्तीने माझी इभ्रत सांभाळावी असे सांगून जाटांच्या काळजात हा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चौधरी अजित सिंग हे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचे पुत्र आहे. बागपत लोकसभा मतदारसंघातून अजित सिंह यांचे पुत्र जयंत चौधरी निवडणूक लढवत आहे. प्रचाराचा धुराळा सत्यपाल सिंग यांच्या प्रचार अभियानात नानू, इकडी यासारख्या गावांमध्ये जेव्हा गेलो तेव्हा प्रत्येक गावात असतात तसेच दोन गट पाहायला मिळाले. एका गटाने चौकात कार्यक्रम घेतला होता तर दुसर्या गटाने म्हणजे प्रधान ज्याला आपण गावाचा सरपंच संबोधतो त्याने आपल्या टोलेजंग घरामध्ये गावातील सगळ्या लोकांना जेवणासाठी आमंत्रित केले होते आणि तो प्रधान सत्यपाल सिंग यांना सांगत होता कि तुम्ही जेवल्या शिवाय जाऊ शकत नाही, या टोलेजंग घराचा मालक आदेश देतो आणि लोकसभेचा उमेदवार एका सेकंदात जेवायला तयार होतो याचाच अर्थ असा होतो की हा प्रधान गावातील बलाढ्य व्यक्ती आहे आणि त्याच्यापुढे सगळेजण नतमस्तक आहे. कौल कुणाला? या प्रचार अभियानादरम्यान या परिसरातील महिला बाहेर पडत नाही हे देखील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाणवले निवडणुकीचा प्रचार रस्त्यावर होत असताना आपल्या घरातील छोट्याच्या खिडकीतून या महिला रस्त्यावरील बेधुंदपणे नाचणाऱ्या गावातील लोकांना पाहून मनातल्या मनात हसत असतील ,असच काहीसं चित्र जवळपास अनेक गावात पाहायला मिळाले. त्यामुळे या बागपत मधील कुठला उमेदवार लोकसभेची बाग फुलवितो आणि कुठला उमेदवार आपली पत गमावतो हे हे आगामी 23 मेला कळेल. मात्र जेव्हा 11 एप्रिलला मतदान होईल तेव्हा भारतीय जनता पक्ष विरुद्ध तीन पक्षाची आघाडी खरंच पश्चिमी उत्तर प्रदेशात कमाल करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.