हरियाणा, 09 फेब्रुवारी : हरियाणामधील गुरुग्राममध्ये भारतीय जनता पार्टी (भाजप)च्या एका महिला पदाधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या महिलेच्या पत्नीचे हत्या केल्याचं समोर आलं आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती फरार झाला आहे. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी रात्री घडली असून मृत महिला मुनेशा गोदारा या भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकारी होती. मुनेशा गोदारा यांनी भाजपमध्ये अनेक पदांवर काम केलं होतं. सध्या त्या किसान मोर्चाच्या महामंत्री म्हणून काम पाहत होत्या. राजकारणात असल्यामुळे मुनेश यांना सारखं बाहेर राहावं लागत होतं. त्यामुळे त्यांच्या अनेक लोकांसोबत भेटीगाठी होत होत्या. मुनेश यांना राजकीय कार्यामुळे बाहेर राहणं आणि लोकांशी बोलणं हे पती सुनील गोदारा यांना आवडत नव्हतं. यातून तो तिच्या चारित्र्यावर संशयही घेत होता. शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास सुनील घरी परतला होता तेव्हा पत्नी
मुनेश या आपल्या बहिणीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. पत्नी कुणाशी व्हिडिओ कॉलवर बोलते हे पाहून त्याला राग अनावर झाला. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर सुनीलने आपल्याकडे असलेली परवानाधारक बंदूक बाहेर काढली आणि पत्नी मुनेशवर एकापाठोपाठ गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या या मुनेश यांच्या छातीत लागल्या त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक गोळीबारामुळे घरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर कुटुंबातील लोकांनी पोलिसांना या घटनेची फोन करून माहिती दिली. काही वेळानंतर पोलीस घरी पोहोचले. तोपर्यंत आरोपी सुनील हा फरार झाला होता. तर मुनेश यांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. गोळीबाराच्या वेळी सुनील हा दारू प्यायलेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुनेश यांच्या भावाने आरोपी सुनीलवर अत्याचाराचे आरोप केले. लग्न झाल्यानंतर त्याने आपल्या बहिणीला मानसिक त्रास दिला. मुनेश आणि सुनील यांचं 2001 मध्ये लग्न झालं होतं. सुनील हा सैन्यातून निवृत्त झाला होता. त्यानंतर तो एका सुरक्षा एजन्सीमध्ये पीएसओ म्हणून काम करत होता. मृत महिलेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, मुनेश यांनी आपल्या मैत्रिणींच्या सल्ल्यावरून 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर महिला मोर्चामध्ये तिने अनेक वेगवेगळ्या पदावर काम केलं. घरी सुनीलसोबत वारंवार भांडणं होतं होती. या प्रकरणी मृत महिलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून आरोपी सुनीलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.