नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: याबद्दल ट्वीट करून माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जी हे रुग्णालयात गेले होते. तेव्हा त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली. यात त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.
प्रणव मुखर्जी म्हणाले की, ‘मी एका कामासाठी रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी मला लागण झाली असल्याचे समजले. त्यामुळे मागील आठवड्याभरात माझ्या संपर्कात असलेल्या लोकांनी कृपया समोर येऊन माहिती द्यावी आणि स्वत: क्वारंटाइनमध्ये राहावे’ असं आवाहन प्रणव मुखर्जी यांनी केले. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजारांवर दरम्यान, भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजाराहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 075 वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 1,007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6 लाख 15 हजार 945 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे. तर 15 लाख 35 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 44, 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जगभरातील कोरोना आकडेवारीचा विचार करता अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात सर्वाधिक कोरोनाची संख्या महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात आहे.