मुंबई: ट्विटरवरचं नवीन चित्र पाहून सुरुवातीला वाटलं हॅक झालंय पण नंतर काहीतरी भलतच समजलं आणि युजर्सना मोठा धक्काच बसला. ट्विटरचा लोगो बदलण्यात आला आहे. कर्मचारी कपातनंतर आता ट्विटरमध्ये काही बदल केले जात आहेत. त्यातलाच एक मोठा बदल म्हणजे ट्विटरचा लोगो बदलण्यात आला आहे. आता ट्विटरवरून निळा पक्षी गायब झाला आहे. या बदलानंतर यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. कारण, ट्विटरने ‘डॉगी’ हा आपला नवा लोगो बनवला आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे, हा डॉगी ट्विटरचा नवीन लोगो असणार अशी आता सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.
या लोगोच्या बदलानंतर आता अनेक युजर्सनी एलन मस्क यांना ट्रोल देखील केलं आहे. काहींनी मजेशीर ट्विट आणि मीम्स तयार केले आहेत. सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला. हा लोगो पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले. एलोन मस्क यांनी मंगळवारी रात्री 12.20 च्या सुमारास एक फोटो ट्विट केला. ज्यामध्ये एक कुत्रा गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे आणि तो त्याचा परवाना वाहतूक पोलिसांना दाखवत आहे. या परवान्यावर निळ्या पक्ष्याचा फोटो आहे (जुना ट्विटर लोगो). कुत्रा ट्रॅफिक पोलिसांना सांगत आहे, “हा जुना फोटो आहे”. मस्कच्या या ट्विटनंतर ट्विटरवर केल्या जात असलेल्या विविध अटकळांना पूर्णविराम मिळाला आणि इलॉन मस्कने लोगो बदलल्याचे स्पष्ट झाले.