नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : दिवसभरातल्या घडामोडींनी काँग्रेसच्या(Congress news) अंतर्गत गोटात खळबळ उडाली असली, तरी संध्याकाळी झालेल्या कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत या सगळ्यावर पडदा पाडल्याचं दाखवण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम (P.Chidambaram) यांनी या वादाबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल आहे, असं मी कधीच म्हणत नाही. समुद्राच्या लाटा कधी शांत होतात का? तशीच अशांतता कायम राहणार. “, असं चिदंबरम म्हणाले. “काही कारणांमुळे असंतोष असणारच. त्यातल्या काही कारणांचा आम्ही आज विचार केला. मला वाटतं, यातूनच पुढे जात पक्ष आणखी बळकट होईल आणि अधिक सक्रिय होईल.”
काँग्रेसबद्दल तसं भाष्य कुणीच केलं नाही, असं चिदंबरम यांनी सांगत सारवासारव केली. भाजपबरोबर संगनमत असल्याचा कोणाचाही आरोप नाही, असंही ते ANI शी बोलताना म्हणाले. पण म्हणून मी कधीच सगळं छान सुरळीत चाललं आहे, असंही मी कधी म्हणत नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. पक्षात सुधारणा घडवण्यासंदर्भात सोनिया गांधींना पत्र लिहिलं ते काम भाजपशी संगनताने केल्याचा राहुल गांधी यांच्या कथित आरोपामुळे दिवसभर काँग्रेसच्या अंतस्थ गोटात खळबळ उडाली होती. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यावर उघड नाराजी, पाठिंबा आणि शेरेबाजी केली. त्यामुळे प्रकरण आणखी वाढत गेलं. शेवटी संध्याकाळी सोनिया गांधी यांनी यावर भाष्य केलं आणि या प्रकारामुळे आपण व्यथित झाल्याचं सांगितलं. तरीही झालं गेलं विसरून कामाला लागलं पाहिजे. हे सगळे सहकारी आहेत, असंही सोनिया म्हणाल्या. सोनिया गांधीच पक्षाच्या हंगामी अध्यक्ष राहतील. लवकरात लवकर शक्य होईल तेव्हा कार्यकारिणीची निवडणूक होऊन नवा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत त्याच पक्षाचं नेतृत्व करतील, असं ठरलं.