बेंगळुरू, 04 मे : गेल्या काही दिवसांपासून डॉ. विजयश्री (Dr Vijayashree) यांचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. डॉ. विजयश्री कोव्हिड 19 (COVID-19) विरोधात लढणाऱ्या डॉक्टरांपैकी एक आहेत. त्या जेव्हा त्यांच्या घरी परततात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण सोसायटी सज्ज असते. सोसायटीतील सर्व विंगमधील माणसं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतात. सोसायटीतील सर्व माणसांचं प्रेम पाहून डॉक्टर देखील भारावून जातात. घरच्यांचे आणि शेजारच्यांचे हे प्रेम पाहून डॉक्टर विजयश्री खूप भावूक झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते आहे. त्यांनी हात जोडून सर्वांना धन्यवाद दिले. कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार दिवसरात्र झटत आहेत. त्यामुळे त्यांचं होणाऱ्या अशा कौतुकामुळे त्यांचं मनोधैर्य वाढण्यास मदत होत आहे.
हा व्हिडीओ बंगळुरूमध्ये राहणाऱ्या मेयर एम गौतम कुमार (M Goutham Kumar) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना देखील डॉ. विजयश्री यांना सलाम केला आहे. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून आतापर्यत जवळपास 10 हजार युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे. डॉ. विजयश्री यांच्यावर त्यांच्या सोसायटीमधूनच नाही तर ट्विटरवर देखील कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले.
संपादन - जान्हवी भाटकर