कटिहार, 14 मे : बिहारच्या कटिहार स्थानकात बिस्कीटांच्या पुड्यासाठी हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. कटिहार स्थानकात मजुरांना खाण्यासाठी देण्यात आलेल्या बिस्कीटांच्या पुड्यांसाठी हाणामारी झाली आणि स्थानकात गोंधळ झाला. या आधी असा प्रकार कल्याणहून निघालेल्या एका श्रमिकांच्या ट्रेनमध्ये काही दिवसांपूर्वी घडला होता. गुरुवारी पुन्हा एकदा हा प्रकार बिहारमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. कटिहार स्थानकाबाहेर श्रमिकांची गाडी थांबली असताना त्यांना खाण्यासाठी बिस्कीटांच्या पुड्यांचं वाटप करण्यात येणार होतं. मात्र ते करण्याआधीच या पिशवीवर मजूर तुटून पडले आणि त्यातून वादाला तोंड फुटले. एकमेकांच्या हातातले बिस्कीटाचे पुडे खेचून घेण्यासाठी झटापट सुरू झाली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे वाचा- तान्हुल्याची फरफट, पायी प्रवास करणाऱ्या आईनं केली सुटकेसची बाबागाडी 50 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांना टाळं लागलं आहे. तर अनेक ठिकाणी मोठे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मजुरांच्या हातात काम नाही. होते ते पैसे जवळपास संपत आले आणि खाण्यासाठी दुसरं काही साधन नाही. उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न समोर असल्यानं पुन्हा आपल्या मूळ गावी जाण्यासाठी या मजुरांची धडपड सुरू आहे. मिळेल त्या वाहनानं, नाही तर पायी मजल-दरमजल करत मजूर आपल्या गावी जात आहेत. काही मजुरांनी पुन्हा मोठ्या शहरांमध्ये न येण्याचं मनोमन ठरवलं तर काही मजुरांना घरीही रिकाम्या हातानं जात असल्याचं ओझं मात्र कायम आहे. खायचं काय हा प्रश्न त्यांच्या डोळ्यापुढे आहे. भुकलेल्या मजुरांची ही अवस्था अंगावर काटा आणणारी आहे. हे वाचा- जन्मलेल्या लेकराला 52 दिवस झाले तरी पाहू शकला नाही पोलीस बाप संपादन- क्रांती कानेटकर