कोल्हापूर, 14 मे : कोरोनाचं थैमान थांबवण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि वाऱ्याच्या वेगाने फिरणारे जग अचानक थांबले. पण जन्म…. जन्म हा होतोच… त्याला कोणी थांबवू शकत नाही. मात्र कोल्हापूरमध्येही जन्मलेल्या एका चिमुकल्याला तब्बल 52 दिवस त्याच्या पोलीस बापाने पाहिलेलं नाही. संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला जनता कर्फ्यु जाहीर केला आणि याच दिवशी कोल्हापूरमधील डॉक्टर सतीश पत्की यांच्या हॉस्पिटलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप गावच्या वर्षा पाटील यांची प्रसुती झाली. जनता कर्फ्यूच्या दिवशीच वर्षा ताईंनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. घरी आलेल्या नव्या पाहुण्यामुळे संपूर्ण पाटील कुटुंबीयांना आनंद झाला खरा…पण त्यावेळी वर्षा यांच्यासोबत फक्त त्यांचीआई होती. त्यानंतर पुढे लॉकडाऊन वाढल्यामुळे कुणीही नातेवाईक रुग्णालयात येऊ शकले नाहीत. त्यामुळे साधेपणाने त्यांनी आनंद साजरा केला खरा, पण याच गोंडस बाळाचा बाप महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे. शशिकांत पाटील हे सध्या पुण्यात पोलीस कॉन्स्टेबल असून तेही कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले आहेत. त्यामुळे गेल्या 52 दिवसांपासून त्यांनी आपल्या चिमुकल्याचा चेहराही पाहिलेला नाही. बाप होणं हा आनंदाचा क्षण असूनही केवळ मोबाईलच्या पाच इंचाच्या स्क्रीनवर आपल्या लाडक्याचा गोंडस चेहरा त्यांना आभाळाइतका नक्कीच दिसत असणार. पण पुण्यासारख्या रेड झोनमधून येऊन आपल्या लेकराला कुशीत घेण्याची कल्पनाही शशिकांत पाटील यांना करता येणार नाही. लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर पत्की यांच्या रुग्णालयात अनेक महिलांच्या प्रसूती झाल्या आहेत. यापूर्वी कधीही दिसलं नाही असं चित्र डॉक्टर पत्की यांनी पाहिलं आहे. अगदी बाळाची पाचवी देखील रुग्णालयात थाटामाटात साजरी केली जायची. पण ती सध्या केली जात नाही आणि नातेवाईक गोड-धोड घेऊन रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला भेटायला पाहायला यायचे तेही बंद झाल्याचे डॉक्टर सतीश पत्की सांगतात. शशिकांत पाटील यांच्या प्रमाणे अनेक बाप आज आपल्या लेकरांना पाहू शकत नसतील. पण कोरोनाच्या लढाईत जे योद्धे आहेत त्यात आपले पोलीसही आहेत. त्यामुळे आपल्या बाळाला न पाहता कर्तव्य बजावणाऱ्या शशिकांत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.