तिरुवनंतपुरम, 12 एप्रिल : भारतात कोरोना व्हायरस दाखल झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यात ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव होता त्यात केरळसुद्धा होते. आता केरळमध्ये रविवारी फक्त 2 नवे रुग्ण सापडले आहेत. तर आणखी 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोनाचे आतापर्यंत 374 रुग्ण आढळले तर यातील 179 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के के शैलजा यांनी सांगितलं की, रविवारी राज्यात 36 कोरोनाग्रस्त रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात फक्त 2 नवे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय सध्या 1.23 लाख लोक क्वारंटाइन असून 714 लोक वेगवेगळ्या रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये आहेत.
मुख्यमंत्री पिनराई विजय यांनी म्हटलं की, राज्यात कोरोना आटोक्यात आला असला तरी लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने हटवला पाहिजे. 14 एप्रिलनंतर केंद्राच्या आदेशानुसार राज्यात पुढची रणनिती ठरवली जाईल. पंतप्रधानांनी सांगितलं आहे की पुढच्या काही आठवड्यात अधिक काळजी घेतली पाहिजे. केरळमध्ये ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त आहे तिथं काळजी घ्यावी लागेल. राज्यात सात हॉटस्पॉट आहेत. यामध्ये कासरगोड, कन्नूर, कोझीकोड, मलप्पुरम, त्रिशूर, एर्नाकुलम आणि तिरुवनंतपुरम यांचा समावेश आहे. याठिकाणी 30 एप्रिलपर्यंत लॉकाडऊन ठेवलं जाण्याची शक्यता आहे. हे वाचा : कोरोनाचा कहर असताना दिल्लीत भूकंपाचे धक्के, ‘देवा काय आहे मनात?’ गेल्या दोन दिवसांत केरळमधील एकूण 55 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. शनिवारी 10 नवे रुग्ण राज्यात आढळले तर 19 जणांना डिस्चार्ज दिला. दहापैकी तीन लोक परदेशातून आले होते. इतर 7 रुग्ण कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यानं त्यांना लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. हे वाचा : LockDown : कंटाळा आल्यावर मित्राकडे जाण्यासाठी जुगाड, सुटकेसमध्ये बसला आणि… संपादन - सूरज यादव