नवी दिल्ली, 30 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 33 पर्यंत पोहोचला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊमुळे अनेक व्यवसाय आणि कारखान्यांना टाळं लागलं आहे. अनेक छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. याच पार्श्वभूमीवर भविष्यात अर्थव्यवस्थेसाठी असणारी आव्हानं आणि अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा नीट बसवता येण्यासाठी कसं नियोजन करणं आवश्यक असेल यासंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासोबत चर्चा केली आहे. राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर देताना राजन म्हणाले की सामाजिक समरसता ही लोकांच्या हितासाठी आहे आणि या आव्हानात्मक काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे. राजन म्हणाले, आपली अर्थव्यवस्था 200 लाख कोटींपेक्षा जास्त आहे आणि आपण 65 हजार कोटी रुपयांचा भार देऊन तेवढे संकटाच्या काळात मदत करू शकतो. या चर्चेदरम्याान महासंकटात गरिबांना मदत करणं आवश्यक आहे यासाठी सरकारनं साधारण 65 हजार कोटी रुपये मदत द्यायला हवी असे रघुराम राजन यांनी सांगितले आहे.
कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यासंदर्भात बोलताना राजन म्हणाले, भारत या संधीचा फायदा घेऊ शकेल. उद्योग आणि पुरवठा चेनमध्ये आपल्याला विशेष स्थान मिळविण्याची संधी आहे. लॉकडाउन जास्त काळ सुरू राहणे शक्य नाही. आपल्याकडे इतर देशांप्रमाणे अर्थव्यवस्था मजबूत नसल्यानं आपल्याला खरेदी-विक्री- आयत-निर्यातीसाठी खुली करावी लागेल असंही रघुराम राजन यांनी सांगितलं आहे.