चांद्रयान 3 चे प्रक्षेपण
नवी दिल्ली, 11 जुलै : जगभरातील आघाडीच्या अंतराळ संशोधन संस्थांमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) समावेश होतो. सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि स्पेस सेक्टरमध्ये काम करणारी ही संस्था सातत्यानं नवनवीन मोहिमांवर काम करत असते. आत्तापर्यंत इस्रोनं अनेक महत्त्वकांक्षी मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत. सध्या इस्रोमध्ये चांद्रयान-3 या मोहिमेची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. इस्रोनं जाहीर केलेल्या माहितीनुसार, 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरून चांद्रयान-3 उड्डाण करेल. चांद्रयान-3 ही भारताची तिसरी चांद्रमोहीम आहे. ‘डीएनए’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लाँच व्हेईकल मार्क-III च्या (LVM3) मदतीनं चांद्रयान 3 अवकाशात झेप घेईल आणि जर सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली तर 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. चांद्रयान 3 प्रक्षेपणाच्या पार्श्वभूमीवर चांद्रयान 2 ही मोहीम पुन्हा चर्चेत आली आहे. चांद्रयान 2 ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नव्हती. त्यामुळे ‘चांद्रयान 3’ हे ‘चांद्रयान 2’पेक्षा कसं वेगळं आहे, याबाबत लोकांच्या मनात उत्सुकता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 मध्ये ऑर्बिटरचा समावेश नाही. पृथ्वीवरचे 14 दिवस म्हणजेच चंद्रावरचा एक दिवस, या कालावधीत लँडर आणि रोव्हर काम करणार असून चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती गोळा करणार आहे. चांद्रयान-3 या मोहिमेचा एकूण कालावधी 14 दिवसांचा असेल. लँडिंगनंतर रोव्हर लँडरपासून वेगळा होईल आणि डेटा गोळा करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. चांद्रयान 2 ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारी कोणत्याही राष्ट्राची पहिली अंतराळ मोहीम होती. 22 जुलै 2019 रोजी लाँच झालेलं विक्रम लँडर 6 सप्टेंबर 2019 च्या पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झालं होतं. सुमारे तीन महिन्यांनंतर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था, नासाला त्याचे अवशेष आढळले होते. लँडर क्रॅश होऊनही ही मोहीम पूर्णपणे अयशस्वी झाली नाही. कारण, ऑर्बिटरनं आपली कामगिरी चोखपणे बजावली होती. ऑर्बिटरनं भरपूर नवीन डेटा पृथ्वीवर पाठवला होता. ज्यामुळे आपल्याला असलेल्या चंद्र आणि त्याच्या पर्यावरणाबद्दलच्या ज्ञानात भर पडली. Explainer: गंगा नदीत 1 हजार कासवे सोडण्यामागे आहे विशेष कारण; भविष्यात होणार फायदा चांद्रयान-2 या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम मॉड्युल सॉफ्ट-लँड करण्याचा आणि पुढील वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी सहा चाकी प्रज्ञान रोव्हर सोडण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांद्रयान-1 चं वजन 1380 किलोग्रॅम होतं, तर चांद्रयान-2 चं वजन 3850 किलो होतं. चांद्रयान-1 ही भारताची पहिली चांद्रमोहीम होती. 22 ऑक्टोबर 2008 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र एसएचएआर येथूनच ही मोहीम लाँच करण्यात आली होती. 29 ऑगस्ट 2009 पर्यंत किमान 312 दिवस चांद्रयान-1 कार्यरत होतं. या कालावधीत यानानं 3,400 हून अधिक चंद्र प्रदक्षिणा पूर्ण केल्या होत्या. सुमारे एक वर्ष तांत्रिक अडचणींशी झुंज दिल्यानंतर आणि त्यानंतर संपर्क तुटल्यानंतर, इस्त्रोनं 29 ऑगस्ट 2009 रोजी चांद्रयान-1 मोहीम अयशस्वी ठरल्याची अधिकृत घोषणा केली होती. आता चांद्रयान 3 च्या माध्यमातून भारत तिसऱ्यांदा चंद्रावर मानवरहित यान पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे.