'बिपरजॉय' गुजरातमध्ये 150 च्या वेगाने कहर करणार
अहमदाबाद, 13 जून : गेल्या दोनतीन दिवसांपासून देशात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने दहशत निर्माण केली आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले. ते म्हणाले की चक्रीवादळामुळे गुजरातमधील कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगर जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसू शकतो. “सौराष्ट्र, कच्छच्या सखल किनारपट्टी भागात तीन ते सहा मीटर उंचीच्या भरतीच्या लाटा येऊ शकतात”, अशी माहिती ‘बिपरजॉय’साठी जारी केलेल्या नवीन अपडेटमध्ये IMD ने दिली आहे. अशा भागातून लोकांना बाहेर काढण्याचा सल्ला आयएमडीने दिला आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सध्या उत्तर-पूर्व अरबी समुद्रात केंद्रित झाले असून ते उत्तरेकडे सरकत आहे. त्यांनी सांगितले की चक्रीवादळ द्वारकेपासून सुमारे 200 किमी दूर आहे. कच्छ आणि द्वारकामध्ये त्याचा प्रभाव दिसून येईल. ते असेही म्हणाले की मंगळवारी सकाळी चक्रीवादळ थोडेसे कमकुवत झाले होते. परंतु, 15 जूनच्या सुमारास ते अत्यंत तीव्र चक्रीवादळाच्या स्थितीत असेल. 15 जूनला खरी परीक्षा ते म्हणाले, ‘चक्रीवादळाच्या जुन्या वेगाच्या तुलनेत बिपरजॉय कालांतराने किंचित कमकुवत झाले आहे. 13 जून रोजी त्याचा वेग 150 ते 160 किमी/तास आणि 14 जून रोजी 135 ते 145 किमी/तास होता. त्याचप्रमाणे 15 जून रोजी चक्रीवादळाचा वेग ताशी 125 वरून 135 किमी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे. 15 जून रोजी दुपारच्या सुमारास गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचेल. याआधी ताशी 135-145 किमी प्रतितास ते 150 किमी वेगाने वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा - Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला, हवामान खात्याकडून मोठी अपडेट विभागाने म्हटले आहे की, 14 जून रोजी राजकोट, जुनागढ, जामनगर आणि द्वारका येथे कमी प्रमाणात पाऊस पडेल. परंतु, या भागात या पावसाने पूर आणि अन्य प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो. लोकांना 15 दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. IMD नुसार, पोरबंदर, राजकोट, मोरबी आणि जुनागढमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. या जिल्ह्यांमध्ये ताशी 140 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. महापात्रा म्हणाले, ‘सौराष्ट्र, कच्छच्या सखल किनारपट्टी भागात तीन ते सहा मीटर उंच समुद्राच्या लाटा उसळू शकतात. अशा भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी पावले उचलावीत आणि अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.