स्नेहा मोरदानी नवी दिल्ली, 24 जुलै : भारतातल्या ठराविक शहरांत जिथे Coronavirus चा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला तिथे अँटिबॉडीज (Antibodies) तपासण्यासाठी सिरो सर्व्हे (Sero Survey)करण्यात आला. त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली. अनेक लोकांना त्यांच्या नकळत Covid-19 चा संसर्ग होऊन गेला आहे. त्यांच्या प्रतिकारशक्तीने या विषाणूचा नायनाट झाला आणि त्यांना लक्षणंसुद्धा दिसलेली नाहीत. भारत आणि इतर काही दक्षिण आशियायी देशांमध्ये Covid चा मृत्यूदर पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारतीयांमध्ये प्रतिकारशक्ती जास्त आहे का आणि ती कुठून निर्माण झाली, याविषयी News18 शी बोलताना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या संचालकांनी(AIIMS)माहिती दिली. AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, “भारताचा कोविड मृत्यूदर इतर काही देशांच्या तुलनेत सातत्याने कमी राहिला आहे. याचा अर्थ आपल्याकडे चांगली रोग प्रतिकारशक्ती आहे. BCG लशीचा हा परिणाम असू शकतो. दुसरं म्हणजे भारताची लोकसंख्या इतकी प्रचंड आहे आणि यातले बहुतांश लोक छोट्या घरांमध्ये दाटीवाटीने राहणारे आहेत. एकच टॉयलेट वापरली जातात आणि अनेक रोगांचा आणि विषाणूंचा प्रादुर्भाव त्यामुळे सतत आपल्या आसपास होत असतो. त्यामुळे आपलं शरीर या विषाणू हल्ल्यासाठी तयार असतं. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती अधिक सक्रिय असू शकते.” अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्पेन अशा अनेक देशांच्या तुलनेत भारत आणि काही दक्षिण आशियायी देशांमध्ये कोरोनाने कमी बळी घेतले आहेत. डॉ. गुलेरिया यांनी भारतात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक असल्याचं दाखवून दिलं. या चांगल्या प्रतिकारशक्तीमागे किंवा कमी मृत्यूदर असण्यामागे आणखी एक कारण असू शकतं असं ते म्हणाले. “कदाचित भारतात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रकार कमी धोकादायक असू शकतो. या विषाणूमुळे सौम्य लक्षणं निर्माण होत असावीत आणि रोगप्रतिकार शक्ती असलेली व्यक्ती त्याचा सामना करू शकत असावी. इटलीसारख्या काही देशांमध्ये या विषाणूचा आणखी धोकायदायक अवतार कार्यरत असावा, अशी एक थिअरी आहे.” सिरो सर्व्हेमधून समोर आलं वास्तव भारतात 20 हजारांहून अधिक लोकांची रँडम ब्लड सँपल्स घेण्यात आली. त्यांच्या शरीरात कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीज तयार झाल्यात का हे या सिरो सर्व्हेमधून दिसलं. अहमदाबादसारख्या शहरात जवळपास 50 टक्के लोकांमध्ये या अँटिबॉडिज तयार झालेल्या दिसल्या. मुंबईच्याही काही भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याचं अनेक लोकांच्या लक्षातही आलं नाही. दिल्लीतसुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग लागून गेल्याची शक्यता आहे. आपल्याकडे या सिरो सर्व्हेमधून 50 टक्क्यांपर्यंत लोकांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या. पण परदेशात असे सर्व्हे झाले त्यावेळी 10 टक्क्यांहून कमी लोकांमध्ये या प्रतिकार करणाऱ्या अँडिबॉडी आढळल्या. भारतीयांची प्रतिकारशक्ती तगडी असल्याचंच यातून स्पष्ट झालं.