मुंबई, 11 जुलै : आज दुपारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत बाहेर आले व माध्यमांशी काहीही न बोलता निघून गेले. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackery) यांच्या बैठकीमध्ये खासदार आणि संजय राऊत (sanjay raut) यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. सर्व खासदारांनी (shivsena mp) आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे राऊत हे बैठकीनंतर कुणाशीही न बोलता बाहेर पडाले. मातोश्रीवरच्या बैठकीत काय घडलं? -बैठक सुरू झाल्यावर कोणत्या विषयावर चर्चा करायची तो मांडण्यात आला. -राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचं..? यावर सविस्तर चर्चा झाली. -प्रत्येक खासदाराला त्याचे मत मांडण्यास सांगण्यात आले. त्यानुसार सर्व खासदारांनी आपलं मत मांडलं. -NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊन १८ जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना मतदान करण्याची भूमिका सर्व खासदारांनी मांडली. -मात्र शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सर्व खासदारांच्या विरोधात भूमिका मांडली. आपण आताही महाविकास आघाडीत आहोत. त्यामुळे विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देऊन त्यांना मतदान करण्याची भूमिका संजय राऊत यांनी मांडली. -सर्व खासदारांचं म्हणणे एकूण घेतल्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण खासदारांच्या भूमिकेवर सकारात्मक विचार करून एक दोन दिवसात अधिकृत भूमिका जाहीर करू असं सर्वांना सांगितले. -राष्ट्रपती निवडणुकीवरील चर्चा संपल्यावर काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाशी चर्चा करून मार्ग काढावा अशी भूमिका मांडली. शिवसेना पक्षाचे निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच ठरवतील. तर विधिमंडळातील सत्ताकारण एकनाथ शिंदे गट ठरवतील. -या चर्चांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही किंवा प्रतिक्रिया दिली नाही. -त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्यासाठी मातोश्रीतूनच चर्चा सुरू झाली आहे.