मुंबई, 25 जुलै : मराठा आंदोलनामुळे काल २४ जुलैला मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पूर्णपणे बंद होता. आज २५ जुलैला या आंदोलनाची झळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना बसणार आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, सातारा या प्रमुख शहरांमध्ये आज आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सध्या राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आंदोलनामुळे काल मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग ठप्प होता. पण या आंदोलनाची झळ आज मुंबईला बसणार आहे. दरम्यान ठाण्यात सकाळपासूनच्या शांततेनंतर आता मराठा मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्याच्या तीन हात नाका ते ज्ञानसाधना कॉलेज रोड आंदोलनकर्त्यांकडून जाम करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहे.