नवी दिल्ली, 01 जुलै: छोट्या बचत योजनांमध्ये (Small Saving Scheme) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही देखील या योजनांमध्ये पैसे गुंतवले असतील किंवा गुंतवण्याचा विचार करत असाल तर केंद्र सरकारकडून अशा गुंतवणुकदारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात या तिमाहीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी स्मॉल सेव्हिंग स्कीम्सचे व्याजदर (small savings schemes interest rate) स्थिर राहणार आहेत. अर्थात काही दिवसांपूर्वी या व्याजदरात कपात होईल असे संकेत मिळत होते, तसा बदल होणार नसून व्याजदर आहेत तेच राहतील. जाणून घ्या PPF, KVP, SSY, NSC, मंथली इन्कम स्कीम, टाइम डिपॉझिट आणि SCSS वर किती व्याज मिळेल. सलग पाचव्या तिमाहीमध्ये सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही आहे. एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीसाठी या छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता; मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी काही तासांमध्ये हा निर्णय मागे घेतला होता. अर्थमंत्रालयाने हा निर्णय चुकून घेतला असल्याचं म्हटलं होतं आणि 24 तासात निर्णय बदलण्यात आला होता. हे वाचा- खूशखबर! सोन्याचांदीच्या दरात घसरण, 10000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे सोनं सध्या काय आहे छोट्या बचत योजनांवर वार्षिक व्याजदर सुकन्या समृद्धी योजना - 7.6 % ज्येष्ठ नागरिक बचत योजना - 7.4 % पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - 7.1 % किसान विकास पत्र - 6.9 % नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट - 6.8 % मंथली इन्कम स्कीम - 6.6 % पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट स्कीम- 5.8 % पाच वर्षांची टाइम डिपॉझिट स्कीम- 6.7 % सेव्हिंग डिपॉझिट- 4 % हे वाचा- Easy Home Loan: मोठं घर घेण्याचं स्वप्न करा पूर्ण!अशाप्रकारे भरा डाऊन पेमेंट-EMI प्रत्येक तिमाहीमध्ये अपडेट केले जातात व्याजदर दर तिमाहीला छोट्या बचत योजनांवरील व्याजदर अपडेट केले जातात. प्रत्येक तिमाहीला व्याजदर घटवले जातात, वाढवले जातात किंवा स्थिर ठेवले जातात. छोट्या बचत योजनांमध्ये पोस्ट ऑफिसच्या योजना विशेष प्रसिद्ध आहेत. या योजनांमधून गुंतवणुकदारांना सुरक्षेची पूर्ण गॅरंटी मिळते. याठिकाणी पैसे सुरक्षित असतात आणि रिटर्न देखील चांगला मिळतो.