नवी दिल्ली, 15 जुलै: ‘एखाद्या व्यक्तीला तुम्ही मासा दिलात, तर ती व्यक्ती एक दिवसभर पोट भरू शकते; पण त्या व्यक्तीला तुम्ही मासेमारी शिकवलीत, तर तो आयुष्यभर गुजराण करू शकतो,’ अशी एक जुनी म्हण आहे. एखादं कौशल्य माणसाला अवगत असणं, किती महत्त्वाचं असतं, हे या म्हणीतून सांगितलेलं आहे. शिक्षण घेणं अत्यावश्यक आहे पण वेगवेगळ्या प्रकारची कौशल्यं अवगत असणंही गरजेचं असतं. चांगलं शिक्षण असेल, तर नोकरी मिळू शकते. पण सध्याच्या काळात प्रत्येकालाच नोकरी मिळेल, याची शाश्वती देता येत नाही. मात्र जरी नोकरी मिळाली नाही, तर अंगी असलेलं कौशल्य उपजीविकेसाठी मदत करू शकतं. देशातल्या जास्तीत जास्त तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची कौशल्यं (Skills) आत्मसात करावीत आणि आत्मनिर्भर व्हावं, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा (PMKVY 3.0) तिसरा टप्पा फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाला आहे. या योजनेत आठ लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रधानमंत्री कौशल विकास योजना जुलै 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. देशातल्या तरुणांना संघटित करून त्यांना त्यांच्यातल्या अंगभूत कौशल्यांचा विकास करायला प्रोत्साहन देऊन, उद्योजकतेविषयीचं प्रशिक्षण (Skill Training) देऊन त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार (Job) मिळवण्यास मदत करणं हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून सव्वा कोटीहून अधिक तरुणांना वेगवेगळ्या कौशल्यांचं मोफत प्रशिक्षण देण्यात आलं आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. हे वाचा- Facebook युजर्ससाठी खूशखबर! आता मिळेल फिक्स्ड कमाईची संधी, वाचा काय करावं लागेल? काही जणांवर काही कारणांमुळे शिक्षण मध्येच सोडण्याची वेळ येते. काही जणांना शिक्षण घेताच येत नाही. अशा तरुणांना आणि अन्य व्यक्तींना रोजगार मिळवण्यात साहजिकच अडचणी येतात. त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजनेतून साह्य केलं जातं. तरुणांना या योजनेअंतर्गत तिमाही, सहामाही किंवा वार्षिक कालावधीसाठी नोंदणी करावी लागते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्याचं प्रमाणपत्र दिलं जातं आणि ते प्रमाणपत्र देशभर वैध असतं. तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत कर्जही (Loan) दिलं जातं. इच्छुक व्यक्ती http://pmkvyofficial.org या वेबसाइटवर जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फिटिंग, कन्स्ट्रक्शन अशा जवळपास 40 तांत्रिक क्षेत्रांतलं प्रशिक्षण यातून घेता येतं. आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडता येतं. ही निवड अर्ज करतानाच करावी लागते. तसंच आपल्या जवळचं प्रशिक्षण केंद्रही निवडता येतं. या प्रशिक्षणासाठी सरकारकडून कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. अशिक्षित किंवा अल्पशिक्षितांना हे कोर्स करण्यास प्राधान्य दिलं जातं. हे वाचा- तुमच्याकडे आहे ‘या’ अंकाची कोणतीही नोट? अशाप्रकारे मिळतील 1-5 लाख रुपये फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 948.90 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 28 राज्यं आणि आठ केंद्रशासित प्रदेशांतल्या 717 जिल्ह्यांत या योजनेचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने दिली आहे. व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यामुळे युवकांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ते स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतात. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क स्टुडंट हेल्पलाइन नंबर (Student Helpline) 88000-55555 स्मार्ट हेल्पलाइन नंबर (SMART Helpline) 1800-123-9626 NSDC TP Helpline नंबर 1800-123-9626 ऑफिशियल वेबसाइट : www.pmkvyofficial.org