नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : देशात एकीकडे डिजीटलायजेशन होत असताना, दुसरीकडे ऑनलाइन फ्रॉडची (Online Fraud) प्रकरणंही मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. मागील काही वर्षात सर्वाधिक फ्रॉड प्रकरणं मोबाइल क्यूआर कोडद्वारे (QR Code) समोर आली आहेत. फ्रॉडस्टर्स अनेक नव्या पद्धतींनी लोकांच्या बँक खात्यातून पैसे चोरी करत आहेत. क्यूआर कोडद्वारे वाढणारी फ्रॉडची प्रकरणं पाहता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या 44 कोटीहून अधिक ग्राहकांना सावध केलं आहे. कोणत्याही व्यक्तीने क्यूआर कोड पाठवून स्कॅन (QR Code Payment) करण्यास सांगितल्यास तो कोड स्कॅन करू नका, अन्यथा मोठा फटका बसू शकतो, असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना दिला आहे. SBI ने ट्विट करत ग्राहकांना अलर्ट केलं आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये सांगितलं, की पैसे मिळवण्यासाठी किंवा एखाद्याकडून पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याची आवश्यकता नाही. यूपीआय पेमेंट (UPI Payment) करताना सेफ्टी टिप्स लक्षात ठेवणं फायदेशीर ठरेल. काय आहे QR Code? क्यूआर कोडमध्ये काही एनक्रिप्टेड माहिती असते. ही माहिती फोन नंबर, वेबसाइटची लिंकही असू शकते. एखाद्या अॅपची डाउनलोड लिंकही असू शकते. ही माहिती डिक्रिप्ट करण्यासाठी त्याला स्कॅन करावं लागतं. स्कॅन केल्यानंतर हा कोड टेक्स्ट रुपात आपोआप ओपन होतो.
कसा होतो QR Code Fraud? SBI ने दिलेल्या माहितीनुसार, QR कोडचा वापर एखाद्याला पेमेंट करण्यासाठी होतो, पेमेंट-पैसे मिळवण्यासाठी नाही. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी कोणी QR कोड स्कॅन करू नका. यामुळे अकाउंट रिकामं होऊ शकतं. SBI नुसार, ज्यावेळी तुम्ही एखादा QR कोड स्कॅन करता, त्यावेळी पैसे मिळत नाहीत. केवळ बँक अकाउंटमधून पैसे गेल्याचा मेसेज येतो. त्यामुळे चुकूनही पैसे कोणाकडून घेण्यासाठी कोड स्कॅन करू नका, हा फ्रॉड ठरू शकतो.
काय घ्याल काळजी? SBI ने दिलेल्या माहितीनुसार, कोणतंही पेमेंट करण्याआधी UPI ID वेरिफाय करा. यूपीआय पेमेंट करताना काही सुरक्षा नियमांचं पालन करण्याची गरज आहे. UPI PIN केवळ पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक आहे. पैसे मिळवण्यासाठी नाही. पैसे पाठवण्यासाठी मोबाइल नंबर, नाव आणि UPI ID वेरिफाय करा. UPI ID कोणाशीही शेअर करू नका. कोणत्याही तांत्रिक बाबींसाठी App च्या हेल्प सेक्शनचा वापर करा. आणि काही संशयास्पद वाटल्यास https://crcf.sbi.co.in/ccf/ या पोर्टलवर तक्रार करू शकता.