नवी दिल्ली, 05 जानेवारी: केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केला जाणार आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार 2021 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2021) दोन भागांमध्ये असणार आहे. 29 जानेवारीपासून याची सुरुवात होणार असून, पहिला भाग 15 फेब्रुवारीपर्यंत असेल. तर 8 मार्च 2021 ते 8 एप्रिल 2021 पर्यंत बजेट सत्राचा दुसरा हिस्सा असणार आहे. या दरम्यान कोरोना संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वे, प्रोटोकॉल्सचे पालन करण्यात येणार आहे. दोन्ही सभागृह आधीप्रमाणेत चार-चार तास कामकाज करतील. सूत्रांनी सीसीपीएचा हवाला देत दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद 29 जानेवारीला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील, केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येईल. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी 2021-22 च्या बजेटबाबत पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि हवामानातील बदल या क्षेत्रांमधील अव्वल तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता. 14 डिसेंबर 2020 पासून अर्थमंत्री सीतारमण विविध क्षेत्रांशी संबंधित तज्ज्ञांबरोब प्री-बजेट चर्चा करत आहेत. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूच्या साथीचा विचार करता यावेळेस सर्व बजेटपूर्व सभा व्हर्च्यूअलीच होत आहेत. (हे वाचा- राहुल गांधी पुन्हा एकदा? काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कोणाची लागणार वर्णी? ) अर्थमंत्र्यांनी अशी माहिती दिली आहे की, आगामी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवरील (Infrastructure) खर्च कायम ठेवण्यावर भर देण्यात येईल. याचा अर्थकारणावर अनेक पटींनी जास्त परिणाम होतो. शिवाय त्यांनी असे म्हटले होते की यातून अर्थव्यवस्थेत शाश्वत पुनर्प्राप्ती पाहायला मिळेल. यावर्षी कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. (हे वाचा- EPFO मध्ये क्रेडिट होत आहे व्याज, तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे आले का?) अशा परिस्थितीत अर्थसंकल्पाचे महत्त्व वाढले आहे. सरकारने सर्वसामान्यांकडून 2021 च्या अर्थसंकल्पासाठी सूचना देखील मागितल्या होत्या. 2021-22 च्या अर्थसंकल्पाच्या चर्चेत लोकांचा जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठी सरकारने MyGov या प्लॅटफॉर्मवर सुविधा दिली होती.