नवी दिल्ली, 5 जानेवारी : काँग्रेस विरोधात झेंडा उचललेल्या नेत्यांनी अध्यक्षपदासाठी निवडणुकीची मागणी केली असली तरी हाती आलेल्या माहितीनुसार पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी (Rahul Gandhi) पुन्हा एकदा काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाची (congress president) जबाबदारी सांभाळण्यासाठी तयार झाले आहेत.
शनिवारी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निवासस्थानी 10 जनपथवर तब्बल 5 तासांहून अधिक वेळ सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित काँग्रेस नेत्यांनी आपआपलं मत समोर ठेवलं. अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांना पुन्हा एकदा काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची मागणी केली. यावर राहुल गांधी म्हणाले की, पक्षाकडून जी जबाबदारी देण्यात येईल ती स्वीकारण्यास तयार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत उपस्थित के. सुरेश, अब्दुल खालिक, गौरव गोगोई आणि काही अन्य खासदारांनी राहून गांधींना पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याचा आग्रह केला. डिसेंबरमध्ये झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत अनेक नेत्यांनी राहूल गांधींना पक्षांचे अध्यक्ष होण्याची मागणी केली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही राहुल गांधींना पुन्हा एकदा अध्यक्षपदावर येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र काही नेत्यांनी याबाबत निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार कॉंग्रेस वर्किंग कमिटी (सीडब्ल्यूसी) ची बैठक येत्या दोन-तीन दिवसात बोलविण्यात येणार आहे. कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात येतील. देशभरातील एआयसीसीच्या निवडून आलेल्या सदस्याचे आय-कार्ड तयार आहे. नवीन सदस्य होणार नाहीत, अशीही बाब समोर आली आहे.
दरम्यान राज्याचा विचार केला तर नवीन वर्षात काँग्रेसमध्ये (Congress) फेरबदल होणार अशी चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (balasheb Thorat) हे आपल्या पदाचा राजीनामा देणार अते वृत्त आले होते. परंतु, थोरात यांनी राजीनामा देण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील हे मुंबईत येणार असून महत्त्वाची बैठक घेणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील हे आज रात्री मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत 8 वाजेच्या सुमारास बैठक घेणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद आणि राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा होणार अशी माहिती आहे. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. प्रदेशाध्यक्षपद हे आपल्याकडे राहणार आहे, तुर्तास काँग्रेसमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाही, असं थोरात यांनी स्पष्ट केले आहे.