नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : कर्मचारी राज्य विमा महामंडळने (ESIC) अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. या योजनेंतर्गत औद्योगिक कामगारांना बेरोजगारी भत्ता दिला जातो. ESIC बेरोजगारी लाभ, ज्याचा उद्देश कोरोनाच्या काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना आर्थिक सहाय्य करणं असून यावर्षी 30 जून रोजी संपला होता. आता 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. अटल बीमित कल्याण योजनेअंतर्गत नोकरी गमावणाऱ्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. हा एक बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा लाभ फक्त त्याच कर्मचाऱ्यांना मिळतो, जे ESIC स्किमअंतर्गत कव्हर आहेत. म्हणजेच ESI योगदान त्यांच्या मासिक पगारातून कापलं जातं. योजनेअंतर्गत बेरोजगार झाल्यास, सरकारकडून जास्तीत जास्त 90 दिवस म्हणजे 3 महिने आर्थिक मदत दिली जाते.
कोरोना काळापासून आतापर्यंत 50000 हून अधिक लोकांना या योजनेचा लाभ निळाला आहे. कोणत्याही कारणामुळे नोकरी गमावलेल्या विमाधारकांना 3 महिन्यांसाठी 50 टक्के पगारावर बेरोजगारी भत्ता देण्याची ही योजना आहे.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या 185 व्या बैठकीत अटल बीमित कल्याण योजना जून 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.