भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 15 जून : आपल्या मुलानं परीक्षेच चांगले मार्क्स मिळवावेत, चांगल्या क्षेत्रात करिअर करावं ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. दहावी-बारावी परीक्षांमध्ये मुलांनी चांगले मार्क्स मिळवल्यानंतर त्यांच्याबरोबरच पालक आणि शिक्षकांच्या स्वप्नांचीही पूर्तता होते. डोंबिवलीच्या श्रेयसी दुर्वे हिनंही नीट परीक्षेत 694 मार्क्स मिळवत, पालकांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं दमदार पाऊल टाकलंय. काय आहे गुपित? श्रेयसी ही रॉयल महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या आव्हावात्मक परीक्षेत यश कसं मिळवलं? याचं गुपित तिनं लोकल18 शी बोलताना शेअर केलंय. ‘मी सुरुवातीला रोज 2 तास, त्यानंतर 4 तास आणि परीक्षेच्या काही महिने आधी 10 तास अभ्यास केला. मी घोकंपट्टी न करता विषय समजून घेण्यापर्यंत भर दिला. एखादी संकल्पना पूर्ण समजेपर्यंत मी जागेवरुन उठत नसे. अभ्यासात सातत्य ठेवलं की परीक्षेच्या कालावधीत कोणताही त्रास होत नाही,’ असं श्रेयसीनं सांगितलं.
सोशल मीडियापासून दूर मी व्हॉट्सअपचा वापर हा शिक्षकांना अभ्यासाचे प्रश्न विचारण्यासाठीच केला. मी वर्षभर टीव्ही पाहिला नाही. सोशल मीडियावरही मी सक्रीय नव्हते. मुड फ्रेश होण्यासाठी वडिलांसोबत रोज एक तास फिरायला जात असे, असं श्रेयसीनं सांगितलं. पंक्चरवाल्याची मुलगी होणार डॉक्टर, पाहा मिसबाहच्या यशाची Inside Story, Video अभ्यास करू नको… बारावीच्या मुलांच्या अभ्यासाचं पालकांना मोठं टेन्शन असतं. त्यांना अनेकदा अभ्यासासाठी मुलांच्या मागं लागावं लागतं. पण, श्रेयसीच्या बाबतीमध्ये परिस्थिती उलटी होती. ‘आम्हाला श्रेयसीला कधीही अभ्यासाबाबत सांगावं लागलं नाही. उलट अभ्यास करु नको, असं तिला म्हणावं लागत असे. श्रेयसीला अभ्यास कमी करण्याचा सल्ला द्या, हे सांगण्यासाठी मी तिच्या शिक्षकांनाही भेटले होते,’ अशी माहिती तिच्या आई प्रविणा दुर्वे यांनी दिली. नीटची परीक्षा कठीण असते. श्रेयसीनं उत्तम मार्क्स मिळवले आहेत. त्यामुळे तिला मनासारखं कॉलेज मिळेल, अशी आशा आहे. श्रेयसी महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीत पहिल्या 20 मध्ये असू शकते, असा विश्वास तिचे शिक्षक गणेश देसाई यांनी व्यक्त केला.