नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 15 जून : मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या NEET UG 2023 या प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थितीवर मात करत मोठया जिद्दीनं यश मिळवलंय. जालना शहरातल्या पंक्चरवाल्याच्या मुलीनंही या परीक्षेत मिळवलेलं यश हे सध्या संपूर्ण शहरात कौतुकाचा विषय बनलंय. मिसबाह खान असं या यशस्वी विद्यार्थीनीचं नाव आहे. मिसबाहच्या वडिल अन्वर खान यांचा गाडीचे पंक्चर काढण्याचा व्यवसाय आहे. बारावीच्या परीक्षेत 86 टक्के मार्क्स मिळवणाऱ्या मिसबाहनं नीट परीक्षेत 720 पैकी 633 मार्क्स मिळवत घवघवीत यश मिळवलंय.
अन्वर खान हे गेल्या 40 वर्षांपासून जुन्या जालन्यातील मुजाहीद चौकात पंक्चर काढण्याचा व्यवसाय करत आहेत.सुरुवातीला सायकलीचं पंक्चर काढणाऱ्या अन्वर यांनी नंतर वाहनांचे पंक्चर काढण्याचा व्यवसाय सुरू केला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं मुलीला कसं शिकवायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण, त्यांनी त्यामधून मार्ग काढत मुलीला शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन दिलं. NEET Result 2023: ‘बीड पॅटर्न’चा देशात डंका, रवीनं मिळवले 720 पैकी 700 गुण, Video मिसबाहनं दहावीच्या परीक्षेत 92 टक्के मार्क्स मिळवले. त्याचवेळी तिनं कलेक्टर किंवा डॉक्टर होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. गेली दोन वर्ष मेडिकल प्रवेशसाठी आवश्यक असा अभ्यास करत तिनं हे यश मिळवलंय. ‘अभ्यास करताना शेवटच्या क्षणापर्यंत चिकाटी सोडता कामा नये. त्याचबरोबर आपण केलेल्या अभ्यासाची नियमित उजळणी करणे आवश्यक आहे, असं मिसबाहनं सांगितलं. कोणतीही परिस्थिती आपल्या ध्येयात अडथळा ठरू शकत नाही. माझ्या या यशात अंकुश सरांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला हे यश मिळवता आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे माझे आदर्श आहेत. आता डॉक्टर होऊन गरीब रुग्णांची सेवा करणार असल्याचं मिसबाहनं सांगितलं.