भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 19 जून: राष्ट्रीय पातळीवर बारावीनंतर घेण्यात येणारी जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षा महाकठीण मानली जाते. याच परीक्षेत देशात 165 वा क्रमांक पटकावण्याची किमया डोंबिवलीकर विद्यार्थ्यानं केलीय. विशेष म्हणजे अविनाश चौधरी यानं बारावीनंतर तिहेरी यश संपादित केलंय. एमएच-सीईटी परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या अविनाशनं जेईई मेन्समध्ये 99.99 टक्के गुण मिळवले. तर जेईई एडव्हान्स्ड परीक्षेत 165 वा क्रमांक पटकावत आयआयटी प्रवेशाचा मार्ग मोकळा केलाय. अविनाशचं तिहेरी यश अविनाश चौधरी हा डोंबिवलीतील रॉयल महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. बारावी परीक्षेत चांगले गुण मिळवून आवडत्या क्षेत्रातील करियर निवडण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्याचसाठी प्रयत्न करताना अविनाशनं यशाची मालिकाच सुरू केली. अविनाशनं बारावी बोर्डाच्या परीक्षेत 98 टक्के गुण मिळवले. तर एमएच-सीईटी परीक्षेत 100 टक्के गुण प्राप्त केली. त्यानंतर दिलेल्या जेईई मेन्समध्ये तब्बल 99.99 टक्के गुण मिळवण्याची किमया केली. तर त्यानंतर आयआयटी प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा दिली आणि त्यातही देशात 165 वा क्रमांक पटकावला आहे. अविनाशच्या या यशामुळं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
हे आहे अभ्यासाचे गुपित अविनाशनं महाविद्यालया समवेतच ॲलन या इन्स्टिट्युट मध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर अभ्यास करताना अविनाश अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास केल्याचे सांगतो. अभ्यासात सातत्य ठेवले की परीक्षेच्या शेवटी कोणताही त्रास होत नाही, असे अविनाश सांगतो. तसेच मी नववी नंतर टिव्ही बघितला नाही. मात्र रोज थोडावेळ खेळायला बाहेर जात होतो, असंही तो सांगतो. विद्यार्थ्यांनी झोप नीट घेणे गरजेचे विद्यार्थ्यांनी रात्रीची सात आठ तास झोप घेणे गरजेचे आहे. रोज एक तास खेळणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर उरलेला सर्व वेळ अभ्यासासाठी देणे गरजेचे असल्याचे अविनाशचे शिक्षक गणेश देसाई यांनी सांगितलं. तर आपण रात्री जागून अभ्यास केला नाही. शक्य तेवढा अभ्यास दिवसाच केल्याचं अविनाश सांगतो. नीट परीक्षेत सोलापूरच्या ईशानला 249 वा ऑल इंडिया रँक, पाहा यश मिळवण्यासाठी कोणता पॅटर्न केला फॉलो Video जेईई एडव्हान्स्ड परीक्षा महाकठीण जेईई परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेसाठी सुरुवातीला जेईई मेन्सची तयारी करावी लागते. जेईई मेन्स मध्ये निवड झाल्यानंतर जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षा द्यावी लागते. अडीच लाख विद्यार्थ्यांची मेन्स परीक्षेमधून निवड झाली आणि त्या विद्यार्थ्यांनी अॅडव्हान्स्ड परीक्षा दिली. या मेन्स परीक्षेत अविनाशने 99.9 टक्के मिळवले. त्यामुळे त्याला अॅडव्हान्स परीक्षेत प्रवेश मिळाला. या परीक्षेतही त्याने बाजी मारली असून आयआयटीमधून इंजिनियर होऊन त्याला देशाची सेवा करायची आहे, असे तो सांगतो.