अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 16 जून : नुकताच मेडिकल क्षेत्रातील नीट या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदाच्या वर्षी जवळपास 20 लाख 87 हजार विद्यार्थी हे सर्व भारतातून नीट परीक्षेसाठी बसले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 30 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही नीट परीक्षा दिली. त्यापैकी महाराष्ट्रातून 2 लाख 73 हजार 819 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 1 लाख 31 हजार 8 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सोलापूरच्या ईशान खटावकर याने 720 पैकी 700 गुण मिळवीत 249 वा ऑल इंडिया रँक मिळवला आहे. कसं मिळवलं यश? ईशान खटावकरचे प्राथमिक शिक्षण हे सोलापुरातील सेंट जोसेफ आणि इंडियन मॉडेल स्कूल येथे झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण हे ग्लोबल विलेज कॉलेज येथे त्याने पूर्ण केले. ईशानचे वडील प्रसन्न आणि आई तृप्ती हे दोघे देखील डॉक्टर आहेत. अत्यंत मेहनतीने अनुकूल परिस्थितीत ईशान हा परीक्षा पास झाला.
परंतु या परीक्षेत त्याचा स्वतःचा वेगळा पॅटर्न आहे. ईशानने या परीक्षेसाठी ऑडिओ बुक नावाची स्वतःची संकल्पना निर्माण केली होती. ज्यावेळी त्याला कोणता टॉपिक किंवा कोणती गोष्ट समजत नव्हती त्यावेळेस ईशान ती गोष्ट आहे तशी रेकॉर्डिंग करून मोबाईलमध्ये जतन करून तो ठेवत होता. त्यानंतर रिकाम्या वेळेत किंवा झोपताना तो ते रेकॉर्डिंग ऐकत झोपायचा त्यामुळे त्याची संकल्पना तर क्लिअर होतच होती. शिवाय त्याने ही ऑडिओ बुक नावाने अनेक टॉपिक जतन करून ठेवले होते. यशाच्या मागे आई शहरातील नावाजलेल्या त्वचारोग तज्ञ म्हणून तृप्ती यांची ओळख आहे. परंतु दीड वर्षापासून ते आपल्या कोणत्याच करिअरमध्ये लक्ष न देता पूर्णवेळ त्यांनी ईशान साठी दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी ईशानला कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही. ईशानच्या या सर्व यशाच्या मागे त्याची आई तृप्ती खटावकर या असल्याचे ईशान आवर्जून सांगतो. माझी आई दहावीत असताना ती राज्यात पहिली आली होती. तोच आदर्श माझ्यासमोर कायम असल्याने आईसारखं उत्तम यश मला कसं मिळेल यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील होतो. माझे हे यश सर्व माझ्या आई-वडिलांच्या मेहनतीमुळे आणि माझ्या बुद्धिमत्तेमुळे आहे असे मला वाटते, असंही ईशान खटावकर सांगतो.
आयुष्यात यशस्वी होऊ शकतो फार पूर्वीपासून ईशाननं आपल्या मनाशी ही गोष्ट बिंबवली होती की त्याला पुढे काय करायचंय त्यामुळे आम्हाला जास्त त्याला अभ्यास कर म्हणावे असे लागले नाही. परंतु मला एक गोष्ट सर्व पालकांना आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे आपल्या पाल्याला जास्त टेन्शन न देता त्याला जे हवे ते करू द्यावे तरच तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, असं ईशानची आई तृप्ती खटावकर यांनी सांगितले.