नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी शिवसेनेच्या पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबरला एक अंतरिम आदेश पारित केला आणि दोन्ही गटांना ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास प्रतिबंधित केले. शिवसेना कोणाची हे ठरेपर्यंत शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आज न्यायालयात याबाबतची सुनावणी झाली. न्यायालयाने काय म्हटले - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षचिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला होता. आता याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेत धनुष्यबाणाचं चिन्हच गोठवलं. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने न्यायालयात धाव घेत हा निर्णयच रद्द करण्याविषयी याचिका केली होती. पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्का देणारा निर्णय कोर्टाने दिला आहे. शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठा निर्णय
तसेच न्यायालयाने पुढे म्हटले की, 23 नोव्हेंबरच्या आत शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांकडून आपापल्या कडची कागदपत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करायची आहेत. तसेच याप्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे निर्देशही न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. याबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोगच घेणार आहे. पण तो त्यांनी लवकरात लवकर घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.