अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 19 जून : राज्यात सध्या आषाढी वारी सुरू आहे. वेगवेगळ्या भागातून हजारो वारकरी पंढरपूरपर्यंत पायी चालत विठूरायांचं दर्शन घेतात. हातात भगवा ध्वज अंगावर पांढरे वस्त्र आणि डोक्यावर टोपी परिधान करत हे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. त्याचवेळी वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी उलटे चालत वारी करतोय. सध्या ते सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. काय आहे त्यांचा उद्देश पाहूया बापूराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड (वय 55, रा. फुरसुंगी, पुणे) असं या वारकऱ्याचं नाव आहे. सामाजिक शास्त्रामध्ये उच्चशिक्षिण घेतलेले बापूराव वयाच्या 16 व्या वर्षांपासून वारी करत आहेत. गेली 28 वर्ष वारी करणाऱ्या बापूराव यांनी यंदा उलट चालत जात वारी करण्याचा संकल्प केलाय.
काय आहे उद्देश? ‘आपण प्रामाणिक आयुष्य जगलं पाहिजे, हा संदेश मी या माध्यमातून देत आहे. अपघात रोखण्यासाठी रस्त्यांची कोट्यावधी रुपये खर्च करुन काम केली जातात. त्यानंतरही हे अपघात थांबलेले नाहीत. सरकारी प्रतिनिधींना अपघात रोखण्यासाठी मदत हवी असेल तर मला नक्की भेटा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, आरोग्य आणि स्वच्छता पाळा, मेरा देश मेरा परिवार या न्यायाने जगा, मतदानाचा हक्क बजावायला विसरू नका, यासारखे सामाजिक संदेश आपण या वारीतून देत असल्याचं बापूराव यांनी सांगितलं. निसर्गाचा शोध घेतला त्यात पांडुरंग भेटला, पाना-फुलांतून साकारला विठ्ठल, Video वेगवेगळ्या वाऱ्यांचा विक्रम फुरसुंगीमध्ये कपड्याचा लहान व्यवसाय सांभळणाऱ्या बापूराव यांनी आजवर वेगवेगळ्या वाऱ्या केल्या आहेत. मुंबईतील मंत्रालयापर्यंत 6 वेळा, शिखरी काठ्यांच्या यात्रेत 6 वेळा त्यांनी वारी केलीय. त्याचबरोबर नवरात्रात दरवर्षी पुणे ते तुळजापूर अशी वारी देखील ते करतात. पुणे ते जंतरमंतर दिल्ली अशी वारी देखील त्यांनी 2 वेळा केलीय.