JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सोलापूरकरांनी 77 वर्षांनंतरही जपल्या आहेत बाबासाहेबांच्या 'त्या' आठवणी, पाहा Video

सोलापूरकरांनी 77 वर्षांनंतरही जपल्या आहेत बाबासाहेबांच्या 'त्या' आठवणी, पाहा Video

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेबांनी 1946 साली सोलापूरला भेट दिली होती. त्या आठवणी सोलापुरकरांनी आजही जतन करून ठेवल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 13 एप्रिल : कोट्यवधी दलितांचे उध्दारक, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूर यांचे एक घनिष्ठ नाते होते. 1924, 1927, 1937 आणि 1946 या वर्षांमध्ये  बाबासाहेब वेगवेगळ्या निमित्तानं सोलापुरात आले होते. 14 जानेवारी 1946 रोजी बाबाहेबांनी भेट दिली होती.  वाडिया हॉस्पिटलसमोर फॉरेस्ट येथील ‘गंगा निवास’ ही वास्तू बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ऐतिहासिक झाली. या ऐतिहासिक भेटीचे वर्णने अनेक जुने कार्यकर्ते मोठ्या अभिमानाने सांगत असतात. कसा होता दौरा? बाबासाहेबांच्या भेटीनिमित्त शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आखण्यात आले होते.  सोलापूर म्युनिसिपल जिल्हा लोक बोर्ड या संस्थेच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या कै. रा.ब. मुळे सभागृहात डॉ. बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले. त्यानंतर त्यांनी बॅकवर्ड हॅास्टेलला भेट दिली . तेथे मोकळ्या मैदानात बाबासाहेबांचे भाषण आयोजित केले होते. याशिवाय विद्यार्थिनी आणि स्त्री शिक्षकांचा मेळावा  याच ठिकाणी आयोजित केला होता. इंडियन फेडरेशन ऑफ लेबरच्या स्थानिक शाखेचे प्रमुख कॉ. पी.जी. बेके व डिकल पार्टीचे जनरल सेक्रेटरी डॉ. के. बी. चिंदरकर यांनी मुलाखात घेतल्याचे सांगितले जाते . त्यावेळेस मुंबई मद्रास मेल सकाळी 8 वाजता सोलापूरला येत असे. 14 जानेवारी 1946 रोजी रेल्वे स्टेशन परिसरात गर्दी झाली होती. गाडीची घंटा झाली आणि बाबासाहेबांच्या जयघोषाने स्टेशन दुमदुमून गेले.

प्रत्येक जण उत्सुकतेनं बाबासाहेब कुठल्या डब्यात आहेत ते शोधू लागला. डब्यातून बाबासाहेब दिसताच लोकांच्या उत्साहाला उधाण आले. पांढरा शर्ट, खाकी पैंट आणि डोक्यावर निळी टोपी परिधान केलेले समता सैनिक दलाचे कार्यकर्ते डॉ. बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी उभे होते. बाबासाहेबांचे आगमन होताच जयजयकार झाला. हार-तुरे स्वीकारून एका काळ्या रंगाच्या कारमध्ये बसून ते फॉरेस्ट येथील एच. सायन्ना गार्ड यांच्या गंगा निवासात उतरले. जिवाप्पा ऐदाळे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बाबासाहेब सोलापुरात आले होते. एच. सायन्ना यांनी ही इमारत 1940 साली बांधली. ते रेल्वेत गार्ड होते. दलित समाजाची या भागातील ही अद्यावत इमारत होती. ती मोठी व दुमजली इमारत होती. अतिशय देखण्या असणाऱ्या या इमारतीत तळमजल्यावर आत बाहेर अशा तीन रूम्स होत्या. चैत्यभूमी, दीक्षाभूमीपाठोपाठ सोलापूरच्या ‘प्रेरणाभूमी’ला आहे महत्त्व! पाहा Video गंगा निवासात बाबासाहेबांना भेटण्यासाठी,त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्या घटनेला आता 77 वर्ष उलटली आहेत. बाबासाहेबांच्या भेटीनं इतिहासात नोंद झालेली ती वास्तू आजही  न्यू तिन्हेगाव फॉरस्ट येथे उभी आहे. ‘बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आम्हाला नेहमीच प्रेरणादायी अशी ठरत आहे. आम्ही आवर्जून आमच्या घरातील लहान व्यक्तींना येथे घेऊन येऊन ही वास्तू दाखवतो. बाबासाहेब आणि सोलापूर यांचे ऋणानुबंध हे फार घट्ट होते हे यामधून सिद्ध होते,’ अशी भावना विश्वा नागटिळक यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या