सोलापूर, 6 डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्याचं जगभर स्मरण केलं जातं. मुंबईची चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी इथं यानिमित्तानं भीम अनुयायांची मोठी गर्दी होती. या दोन्ही ठिकाणांना मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीसह सोलापूरची प्रेरणाभूमी देखील भीम अनुयायांसाठी वंदनीय आहे.
बाबासाहेबांचं सोलापूर कनेक्शन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात सोलापूरचं मोठं महत्त्व होतं. अकरावेळा सोलापूरकरांना त्यांचा सहवास लाभला. 14 जानेवारी 1946 रोजी सोलापूर नगरपालिकेतर्फे बाबासाहेबांना मानपत्र देण्यात आले. त्यावेळी, 'मी माझ्या कार्याची मुहूर्तमेढ ही सोलापूरमधूनच रोवली,' असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं.
बाबासाहेबांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 11 डिसेंबर रोजी त्यांच्या अस्थी सोलापूरमध्ये आणण्यात आल्या होत्या. बाबासाहेबांचे सोलापुरातील निकटवर्तीय केरू रामचंद्र जाधव आणि जिल्हा दलित फेडरेशनचे तत्कालीन चिटणीस आर.एस. रणशृंगारे यांच्या पुढाकाराने या अस्थी आणण्यात आल्या. त्यावेळी या अस्थींच्या दर्शनासाठी रेल्वे स्टेशनच्या बाहेर 5 ते 6 हजार सोलापूरकर उपस्थित होते.
66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये रंगली शाहिरांची मैफील, Video
दलित फेडरेशनच्या वतीने सकाळी नऊ वाजता फॉरेस्ट विभागातील शाळा क्रमांक 10 पासून हे मिरवणूक काढण्यात आली. पांजरपोळ चौक येथे शहरवासीयांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. बुधवार पेठ, मिलिंद नगर मधील ऐतिहासिक पंचाची चावडी येथे बाबासाहेबांची अस्थी आणण्यात आली. 2011 साली या आस्थिविहाराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या अस्थिविहाराला प्रेरणाभूमी असे नाव देण्यात आले.
66 वर्षांपासून अस्थिंचं संवर्धन
गेली 66 वर्ष या आस्थिचे संवर्धन आणि जतन करण्यात येत आहे. सध्या या नव्या इमारतीत तळमजल्यावर बाबासाहेबांचा सोलापूरला लाभलेला सहवास आणि त्या संदर्भातील थोडक्यात माहिती देणारे दुर्मिळ स्वरूपातील छायाचित्र लावण्यात आले आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर बाबासाहेबांची अस्थी ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर बाबासाहेबांच्या जीवनातील बारा ते तेरा प्रमुख प्रसंगावरील प्लेट वर्क शिल्पसृष्टी साकारण्यात आली आहेत. यामध्ये माणगाव परिषद ,संविधान लोकार्पण, चवदार तळे सत्याग्रह, धर्मांतर सोहळा ,काळाराम सत्याग्रह ,गोलमेज परिषद ,पुणे करार या महत्त्वाच्या विषयांचा समावेश केला आहे.
शिका, संघटित व्हा अन्...! WhatsApp Status ला ठेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्षमय विचार
मागील अनेक वर्षांपासून बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या दिनविशेष दिनी येथे सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. दरवर्षी सोलापूर पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त , जिल्हा परिषद सीईओ , जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना देण्यात येते.
'आंबेडकरी जनसमुदायाला चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी हे ऊर्जा स्त्रोत वाटतात त्याचप्रमाणे आम्हा सोलापूरकरांसाठी प्रेरणाभूमी ही प्रेरणादायी आहे. अशिक्षित असणारा येथील समाजात आज डॉक्टर, इंजिनिअर, वकील ,तसेच उच्च दर्जाची प्रशासकीय पदे येथील युवकांनी भूषवली आहेत तसेच अनेक जण प्रदेशात शिक्षण घेत आहेत, ते सर्व श्रेय या प्रेरणाभूमीचेच आहे,' असे आतिश बनसोडे यांनी सांगितले.
गुगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dr. Babasaheb Ambedkar, Local18, Mahaparinirvan divas, Solapur