JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शरद पवारांच्या एका पत्रकार परिषदेने महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? फडणवीसांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष

शरद पवारांच्या एका पत्रकार परिषदेने महाराष्ट्राचं राजकारण बदलणार? फडणवीसांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर आपली भूमिका मांडली आहे.

जाहिरात

शरद पवार

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ऋतुजा यांनी उमेदवारी अर्ज देखील सादर केला आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मत आहे. त्यांनी याबाबतचं पत्र भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज पाठवलं. राज ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील तीच भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील राजकीय संस्कृती टिकून राहावी आणि जनतेत चांगला संदेश जावा यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्या, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. शरद पवार यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता भाजप आणि मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांच्या आवाहनानंतर भाजप आपल्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. “मला एक स्टेटमेंट द्यायचं आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही निवडणूक साधारणत: दीड वर्षाच्या कालावधीसाठी आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्देवी निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणूक लढवत आहेत. तसेच भाजपचे मुरजी पटेल यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्याप्रसंगी मी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी भूमिका घेतली की, गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कुणी उमेदवार उभा राहत असेल तर आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार उभा करणार नाही. आम्ही तसा निर्णय देखील घेतला”, असं शरद पवार म्हणाले. ( राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, अंधेरीची निवडणूक बिनविरोध? ऋतुजा लटके म्हणतात… ) “मला प्रामाणिकपणे वाटते रमेश लटके यांचं योगदान आणि या पोटनिवडणुकीचा कालावधी पाहता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणे योग्य होईल. व महराष्ट्रात योग्य संदेश जाईल. यासाठी निवडणुकीची कोणतीही प्रतिक्षा न करता महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे, असं सर्व संबंधितांना मी आवाहन करतो”, असं शरद पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार? शरद पवार यांनी आवाहन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं. त्यांचं राज्य आणि देशासाठी मोठं योगदान आहे. त्यामुळे राज्यच नाही तर देशाच्या राजकारणात त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. पवारांच्या भूमिकेचा भाजपच्या वरिष्ठांनी विचार केला आणि पोटनिवडणूक लढविण्याचा विचार मागे घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात काही काळ शांतता निर्माण होईल. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापलं होतं. ऋतुजा लटके यांच्या नोकरीचा राजीनामा स्वीकारण्यावरुन मोठं घमासान पाहायला मिळालं. याशिवाय याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा निवडणूक आयोगात तात्पुरता स्वरुपाचा निकाल लागला. ठाकरे गट आणि शिंदे गटाला वेगवेगळं नाव आणि चिन्हे मिळाली. पण शरद पवारांच्या आवाहनाला भाजपने प्रतिसाद दिला तर पोटनिवडणुकीच्या तोफा थंड होतील आणि ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या