सांगलीमध्येही ईडीचं धाडसत्र
आसिफ मुरसळ, प्रतिनिधी सांगली, 23 जून : मुंबईतल्या ईडीच्या धाडसत्रांचं लोण आता सांगलीमध्येही पोहोचलं आहे. सांगली शहरातील इलेक्ट्रिकल व्यवसायिक पारेख बंधू आणि निकटवर्तीयांसह दोन व्यापाऱ्यांवर आज ईडीच्या पथकांनी धाडी टाकल्या. सकाळी लवकर झालेल्या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली. छाप्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती ताब्यात घेतली असल्याचं समजत आहे. तर पारेख यांच्यासह चार व्यापाऱ्यांवर ईडीच्या धाडी पडल्या आहेत. 14 तास उलटले असून अजूनही कारवाई सुरूच आहे. आज पहाटेच 11 वाहनांमधून 60 अधिकारी या कारवाईसाठी सांगलीत दाखल झाले होते. दक्षिण शिवाजीनगरमधील सुरेश पारेख आणि दिनेश पारेख यांच्या बंगल्यावर त्यांनी छापे घातले. या पथकासोबत आलेल्या सीआरपीएफच्या जवानांचा बंगल्यासमोर बंदोबस्त ठेवण्यात आला. पारेख यांचा गणपती पेठेत, पटेल चौकात इलेक्ट्रिकलचा मोठा व्यवसाय आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी घराची झडती घेऊन महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. तसेच त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणीही छापा टाकून तेथूनही महत्त्वाची कागदपत्रे, माहिती घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. कोविड काळात बीएमसी अधिकारी मालामाल? ईडीच्या धाडीत सापडलं घबाड! पारेख यांच्या बंगल्यातून माहिती घेतल्यानंतर हे पथक त्यांचे बँक खाते असलेल्या बँकेतही दाखल झाले. तेथे त्यांच्या खात्यामधील व्यवहारांची माहिती घेतली. ईडीच्या पथकांनी शहरातील आणखी दोन व्यापाऱ्यांवरही कारवाई केल्याचे समजते. विश्रामबाग परिसरातील सरस्वती नगरमधील एका व्यापाऱ्यावर तसेच रतनशीनगर पाठीमागील एका व्यापाऱ्यावरही ईडीच्या पथकाने आज कारवाई केली. सदरचे व्यापारी पारेख यांच्याशी संबंधित असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातंय. पारेख यांच्यावर यापूर्वीही आर्थिक अनियमितते प्रकरणी जीएसटी, व्हॅट, कस्टम्स विभागाच्या कारवाई झाल्या आहेत. यानंतर आता ईडीची कारवाई झाली आहे. आजच्या कारवाईचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून ही कारवाई झाल्याचे समजते.