प्रशांत बाग, प्रतिनिधी मुंबई, 23 जून : कोविडच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात कोणतीच कसर न सोडल्याचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपलं उखळ कसं पांढरं करून घेतलं आणि स्वतः कसे मालामाल झाले, याच्या सुरस कहाण्या आता बाहेर येत आहेत. ईडीच्या धाडसत्रात तर अधिकाऱ्यांच्याच करोडोंच्या मालमत्ता उघड झाल्याने, कुंपणानंच शेत खाल्लं का ? हा प्रश्न उपस्थित झालाय. मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळा सध्या चांगलाच गाजतोय. या प्रकरणी ईडीकडून वेगवान तपास केला जात आहे. त्यामध्ये ठेकेदार, राजकारणी आणि मुंबई मनपा अधिकाऱ्यांमधील आर्थिक हितसंबंध उजेडात आले आहेत. कोणताही अनुभव नसलेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट देण्यात आलं होतं. हे कंत्राट देताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. या प्रकरणात तत्कालीन मनपा अधिकाऱ्यांनी आपले हात ओले करून घेतल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. ईडीने घेतलेल्या झाडाझडतीत एक-एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. सनदी अधिकारी संजीव जायस्वाल यांच्याकडे मोठं घबाड सापडल्याचं बोललं जातं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीएमसीचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जायस्वाल यांच्याकडे 24 मालमत्ता आढळून आल्या आहेत. तसंच त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तांची एकूण किंमत 34 कोटींच्या घरात आहे. मुंबईच्या मढ आयलंड परिसरात त्यांच्या मालकीचा अर्धा एकर भूखंड आहे. शिवाय बँकेत 15 कोटीच्या एफडी आढळून आल्या आहेत, ही सगळी संपत्ती पत्नीला तिच्या कुटुंबियांकडून मिळाल्याचा जयस्वाल यांचा दावा आहे. कोविड सेंटर घोटाळ्यात आतापर्यंत जवळपास 150 कोटींच्या मालमत्ता ईडीच्या हाती लागल्याचं बोललं जातंय. ईडीकडून चौकशी करण्यात आलेल्या व्यक्तींकडे आढळून आलेली संपत्ती चक्रावून टाकणारी आहे. त्यामुळेच आता ईडीनं अधिक खोलात जाऊन तपास सुरु केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.