मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डॉक्टरांवर कारवाई
मुंबई, 4 मार्च : नायक चित्रपटामध्ये अनिल कपूरने एका रुग्णालयातील डॉक्टरला जागेवरूनच निलंबित केल्याचा सीन तुम्हाला आठवत असेल. डॉक्टरच्या गलथान कारभारामुळे अनिल कपूर डॉक्टरला तिथल्यातिथे निलंबित करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नायक स्टाईलने दोन डॉक्टरांचं निलंबन केलं आहे. ठाण्यातल्या कळव्यामध्ये असलेल्या या डॉक्टरांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली आहे. कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर योगेश शर्मा यांना निलंबित करण्यात आलं आहे. रुग्णालयात जाऊन चौकशी केल्यानंतर सोयी-सुविधांचा अभाव असल्याचं लक्षात आलं. यानंतर मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाचे डीन योगेश शर्मा आणि उपअधिष्ठाता डॉक्टर सुचितकुमार कामखेडकर यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे.
कोणालाही पाठीशी घालण्याचं काम होता कामा नये. मी आता छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला गेलो होतो. जे डॉक्टर चांगलं काम करतायत सेवा देतायत त्यांची परिस्थिती चांगली नाही. जे जबाबदार अधिकारी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचनाही आयुक्तांना दिली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.