साप चावल्यानं चिमुकलीचा मृत्यू
नवी मुंबई, 28 जुलै, प्रमोद पाटील : पेणमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. साप चावल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सारा ठाकूर असं या बारा वर्षीय मुलीचं नाव आहे. तिला मन्यार जातीच्या विषारी सापानं चावा घेतला होता. मात्र वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. साराच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली आहे. साराच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सारा ठाकूर या चिमुकली मन्यार जातीच्या विषारी सापानं दंश केला. पेण तालुक्यातील जिते गावातील ही घटना आहे. दंश झाल्यानंतर तिला उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे उपचार न झाल्याने पेण येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे देखील उपचार करण्यात आले नाहीत. त्यानंतर तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर कळंबोली येथील रुग्णालयात नेले, मात्र योग्यवेळी उपचार न मिळाल्याने साराचा मत्यू झाला आहे. जर वेळेत उपचार मिळाले असते तर तीचे प्राण वाचवता आले असते. ग्रामस्थ आक्रमक दरम्यान साराच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनाला धारेवर धरले असून, साराच्या मृत्यूला आरोग्य विभागच जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.