माणसाने वेदना सोसाव्या तरी किती, काही हद्द?
राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर, 7 जुलै : माणसाने वेदना सोसाव्या तरी किती, काही हद्द? असा संतप्त सवाल पालघरच्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. येथील स्मशानभूमीची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की, मृत व्यक्तीच्या चितेवर पत्रे धरून अग्नी द्यावी लागतेय. या भीषण प्रकारानंतर आतातरी आमचा विचार करा, अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. पालघर जिल्हा निर्मितीला तब्बल नऊ वर्ष उलटले आहेत, मात्र अजूनही तिथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. साखरे धोडीपाड्यात गोविंद वाळू करमोडा या शंभरी पार केलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता, अशात स्मशानभूमीवर पत्रे नसल्याने त्यांची चिता जळतच नव्हती. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या कुटुंबियांना मोठी कसरत करावी लागली. धो धो पावसात भिजत चितेवर हातात पत्रे धरून त्यांना अग्नी देण्यात आली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून यामुळे जिल्ह्यात मूलभूत सोयी-सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. शिवाय या स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे .
दोन दिवसांपूर्वीच पालघरच्या किराट गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसातच एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले होते. त्यानंतर लगेचच हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. BMC Recruitment: 12वी पास उमेदवारांसाठी मुंबई महापालिकेत नोकरीची मोठी संधी; या पत्त्यावर आताच पाठवा अर्ज दरम्यान, अशा विविध दुर्घटनांमधून पालघर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद नागरिकांना प्राथमिक सुविधा देण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याचं वारंवार उघडकीस येत आहे. जिल्ह्यात रस्ते, पाणी, आरोग्य, स्मशानभूमी, शिक्षण, अशा सर्व प्राथमिक सुविधांची दुरावस्था असून याचा मोठा फटका स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यातच आता पावसाचे दिवस असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.