एक बातमी अन् आठवड्यात उभारला लोखंडी पूल
तुषार शेटे, प्रतिनिधी ठाणे, 23जुलै : ठाणे जिल्ह्यातला आदिवासी बहुल तालुका अशी शहापूर तालुक्याची ओळख आहे. मुंबई नाशिक या मेट्रोसिटींचा मध्यवर्ती तालुका जरी असला तरीही विकासापासून हा तालुका अद्यापही दूरच आहे. या तालुक्यात विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत जात होते. न्यूज18 लोकमतने याचे वृत्त प्रसिद्ध करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने दखल घेतली आणि अवघ्या 6 दिवसांमध्ये या ठिकाणी लोखंडी पूल बांधला आहे. काय होती बातमी? शहापूर तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांनी अद्याप वीज पाहिली नाही. अनेक वर्षानंतरही इथल्या समस्या आजही कायम आहेत. माहुली किल्ल्याच्या जवळ पिवळी ग्रामपंचायतीमध्ये रताळे पाडा नावाचा छोटासा आदिवासी पाडा आहे. या पाड्यात 19 घरं असून जवळपास प्रत्येक घरातलं मूल शाळेत जातं. रताळेपाड्यात 1 ते 4 थी पर्यंतची शाळा भरते तर पिवळी पाड्यावर 5 ते 12 पर्यंतचे वर्ग भरतात. मात्र, पावसाळ्यात विद्यार्थ्यांचं अनेकदा नुकसान होतं. कारण या दोन्ही पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता नाही. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना लाकडी साकवावारून शाळेत जावं लागतं. यापूर्वी 2 वेळा हा साकव वाहूनही गेला होता. मात्र, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी स्वत:च श्रमदानातून साकव तयार केला. मात्र जेव्हा जोरदार पाऊस होतो. तेव्हा विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. जास्तच जोरदार पाऊस झाला तर साकव पाण्याखाली बुडून जातो आणि विद्यार्थ्याची शाळा बुडते.
पावसाळ्यात शहापूर तालुक्यात नाले आणि नद्या दुथडी भरून वाहतात. या भागात आणखी किती दिवस पाऊस असाच राहील आणि विद्यार्थ्यांची शाळा किती दिवस बुडेल या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी विद्यार्थ्यांकडे नाहीये. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्या, नेत्यांनी राज्यकर्त्यांनी या पाड्यांमध्ये किमान सोयी सुविधा पुरवण्यास प्राधान्य द्यावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली, अशा प्रकारचं वास्तव न्यूज 18 लोकमतने दाखवलं होतं. वाचा -
इर्शाळवाडी शोध मोहिम थांबवली, बेपत्ता लोकांना मृत घोषित करणार; प्रशासनाचा मोठा निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल न्यूज 18 लोकतमच्या या बातमीची मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ दखल घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागलीच प्रशासनाला सुचना देऊन जातीने यात लक्ष घातलं. अवघ्या 6 दिवसांमध्ये या ठिकाणी लोखंडी पूल बांधण्यात आला आहे. नवीन पूल बांधल्याने विद्यार्थी तर खुश झालेच पण गावकऱ्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. उद्या सोमवारी (24 जुलै) या लोखंडी पुलाचं उद्घाटन होणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता पाहायला मिळाली आहे.