चंद्रकांत फुंदे, पुणे, 24 डिसेंबर : पुणे इथं साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दिनांक 28 आणि 29 डिसेंबर रोजी आयोजित 19 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार होती. मात्र ही बहुचर्चित मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या मुलाखतीकडे डोळे लावून बसलेल्यांची निराशा झाली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत ही मुलाखत घेणार होते. मात्र, राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे ही मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतच ही मुलाखत आयोजित करण्यात येईल. त्यामुळे लवकरच जाहीर व्यासपीठावर संजय राऊत आणि शरद पवार यांच्यातील प्रश्नोत्तराची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. साहित्यिक कलावंत संमेलनातील दिनांक 28 आणि 29 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे येथे आयोजित उर्वरित सर्व कार्यक्रम नियोजित वेळेतच होणार आहेत, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव वि.दा. पिंगळे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंसोबत काय चर्चा झाली? प्रकाश आंबेडकरांनी केला खुलासा दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधी पुण्यात जाहीर व्यासपीठावर शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टोकदार प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली होती. त्यामुळे राज्यभरात ही मुलाखत चांगलीच गाजली. त्यानंतर आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात ज्या दोन व्यक्तींचा मोठा वाटा होता त्या शरद पवार आणि संजय राऊत यांच्यातील जुगलबंदीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.