विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक 20 एप्रिल : ‘मूर्ती लहान पण, किर्ती महान ’ ही म्हण नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या पूजा घोडके या तरुणीने सिद्ध करून दाखवली आहे.अवघी 3 फूट उंची असलेली पुजा आयुष्यात काय करणार ? म्हणून तिला लहानपणापासून अनेक जण चिडवत असत. पूजाच्या आई-वडिलांनाही तिचं पुढं काय होणार? हा प्रश्न सतावत होता. पण, पूजानं खंबीरपणे या सर्वांना उत्तर दिलंय. पूजानं सुरूवातीला एमकॉमचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तिला उंचीमुळे नोकरी मिळण्यात अडचण येत होती. या सर्व अडचणींवर जिद्दीनं मात करत पूजानं पापड उद्योग सुरू केलाय. तिच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळतोय. तिचा आजवरचा प्रवास कसा झाला हे पूजानंच आपल्याला सांगितलं आहे.
3 फूट उंची पण अफाट जिद्द! ‘प्रत्येक व्यक्तीला संकटाना सामोेर जावं लागतं. काही जण त्याला घाबरतात. हतबल होतात. तर काही जण त्याला सामोरं जाऊन त्यावर मार्ग काढतात. माझ्यावरही असंच संकट ओढावलं होतं. माझी उंची जन्मत:च कमी होती. मी जन्माला आले तेव्हाच डॉक्टरांनी आई-वडिलांना उंची वाढणार नाही, हे सांगितलं होतं. माझं वय वाढत होतं, पण उंची तशीच होती. त्यामुळे माझं कसं होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. उंची कमी असली तरी मी हुशार होते. माझं अभ्यासात मन रमत होतं. मी एमकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. मला बँकेत नोकरी करण्याची इच्छा होती. त्यासाठी अनेक परीक्षा दिल्या पण त्यामध्ये यश मिळालं नाही. माझी बोटं लहान असल्यानं मला कॉम्पयुटरवर टायपिंग करता येत नसे, त्यामुळे मला परीक्षेत अपयश यायचं. या अपयशानंतर मी स्वत:चा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हायचं ठरवलं. असा अनुभव पूजानं सांगितला. वडिलांच्या कष्टाचं चीज, बांधकाम मजुराच्या दोन्ही मुली झाल्या पोलिस कॉन्स्टेबल, पाहा Video मी बँकेकडून कर्ज घेऊन,पापड,कुरडई, शेवई तयार करण्याचे मशीन घेतले आणि व्यवसायाला सुरुवात केली आणि,आज माझा व्यवसायात चांगला जम बसला आहे, असा अनुभव पूजानं सांगितला. शॉर्ट हाईट फ्युचर ब्राईट! उंची कमी असली म्हणून काय झालं,माणसाच्या मनात काम करण्याची जिद्द आणि चिकाटी जर असेल तर आयुष्यात काहीच कमी पडू शकत नाही,फक्त हिम्मत असावी लागते,आणि हाच संदेश पुजा घोडके इतर महिलांना देत आहे.विशेष म्हणजे अनेक महिला या हतबल होतात.निराश होतात,आता आयुष्यात काही नाही राहील म्हणून टोकाचं पाऊल उचलतात. त्यांनी निराश न होता पूजाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणे आवश्यक आहे.