नागपूर, 14 जुलै : पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण तसंच शहरी भागांमध्ये सापाचा मोठा वावर असतो. विषारी सापाच्या दंशाने वेळीत उपचार न झाल्यास त्यात एखाद्याच्या जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे साप चावल्यानंतर तातडीनं काही खबरदारीचे उपाय करणे आवश्यक आहे. हे उपाय केले तर जीव नक्की वाचतो. एखाद्याला साप चावल्यास काय उपाययोजना करावी? याबाबत नागपूरचे सर्प मित्र श्रीकांत अंबरते यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आपल्या देशात 300 पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आहेत. त्यामधील 15-20 टक्के प्रजाती या विषारी सापाच्या प्रजाती आहेत. त्यामधील नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे 4 विषारी साप मानवी वस्तीत आढळतात. आपल्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सापांमध्ये यांचा सर्वाधिक समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात हे मृत्यू जास्त होतात,’ अशी माहिती अंबरते यांनी दिलीय.
काय उपाय करावे? ‘सर्पदंश झालेल्या व्यक्तीमध्ये भीती वाढत असते. त्यांना धीर देऊन सामान्य ठेवावे. भीतीमुळे हृदयाचे ठोके वाढत असतात परिणामी रक्तप्रवाह जलद गतीने होऊन त्यात मृत्यूचा धोका असतो. आता सर्व हॉस्पिटलमध्ये सर्प दंशावर औषध उपचार उपलब्ध आहेत. सर्पदंश झाल्यावर कुठल्याही अंधश्रद्धांना बळी न पडता दवाखान्यात उपचार घेणे हाच एक उत्तम उपाय आहे. बऱ्याचदा सर्पदंश झालेल्या ठिकाणावर घाव घालून त्यातून रक्त ओढण्याचा किंवा विष ओढण्याचा प्रयत्न करत असतात मात्र याने धोका अधिक वाढू शकतो. शक्य असल्यास सर्पदंश झालेली ठिकाण स्वच्छ करून इन्फेक्शन पासून धोका टाळावा,’ असे अंबरते यांनी सांगितलं. साप दिसल्यावर किती फूट अंतर दूर उभं राहिलं पाहिजे? विषारी की बिनविषारी कसं ओळखायचं? काय काळजी घ्याल? पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने, बेडकांच्या शिकारीसाठी, प्रजनांसाठी अशा अनेक कारणांसाठी साप बाहेर पडत असतात. त्यावेळी सर्पदंश होऊ नये म्हणून विशेषत: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पायात लांब जोडे घालावे. अनोळखी ठिकाणी हात घालताना काठीने शहानिशा करावी, असा सल्ला इंबराते यांनी दिला. साप हा निसर्गाचा आणि शेतकऱ्यांचा मित्र असून त्यांचा अधिवास निसर्गात महत्त्वाचा आहे. साप दिसल्यास त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क करून सुरक्षित ठिकाणी त्याला सोडावे. सर्प संवर्धनासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे, असं आवाहन अंबरते यांनी केलं.