नागपूर, 07 जुलै : बदलत्या वातावरणाचा परिणाम जसा मानवी आरोग्यावर होत असतो तसाच तो पशुधनाच्या आरोग्यावरही देखील होतो. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने वातावरण अनेक सुक्ष्मजीवाणुच्या वाढीसाठी अनुकूल असते. परिणामी पावसाळ्यात विविध साथीच्या आजारांची लागण होते आणि त्याची तीव्रता जास्त झाल्यास जनावरे दगावन्याचा धोका सर्वाधिक असतो. ज्यामुळे त्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते. या बदलत्या वातावरणाशी सामना करण्यासाठी पावसाळ्यामध्ये पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी मान्सून पूर्व लसीकरण करुन घेणे गरजचे आहे. पावसाळ्यामध्ये गायी म्हशीसह इतर सर्व पशुधनाचे साथीच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी मान्सून पूर्व लसीकरण करून घेण्यासाठी शासकीय पशु वैद्यकीय केंद्रात या संबंधीत सर्व लस नाममात्र शुल्कात उपलब्ध आहेत. त्याचा पशुपालकांनी कसा लाभ घेत आपल्या पशुंची काळजी घ्यावी याबद्दल नागपूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नितीन फुके यांनी माहिती दिली आहे.
कसा घेता येईल लाभ? सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत या दिवसात संभाव्य उद्भवणारे आजार लक्षात घेता पशुसंवर्धन विभाग पशुंच्या आरोग्याच्या दृष्टीने तत्पर राहते. पावसाळा सुरू होत असताना अथवा पावसाळ्यानंतर मोठ्या जनावरांना जसे की गाई म्हशी यांच्यामध्ये घटसर्प तसेच एकटांग्या सारखे आजार उद्भवत असतात. या आजारांमध्ये वेळीच उपचार न घेतल्यास जनावरांमध्ये त्रास वाढतो आणि परिणामी जनावर यात दगावत असतात. सबब या आजारांवर प्रतिबंध व्हावा म्हणून घटसर्पाची लस शासकीय पशु संवर्धन केंद्र अथवा पशु दवाखान्यात दिली जाते. तसेच लहान वासरांना एक टांग्याची लस दिली जाते. ही लस नागपूर जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्था दवाखाने यात उपलब्ध आहे. तसेच मधल्या काळात देशभर लंम्पी आजारामुळे अनेक जनावरे दगावली यामध्ये अनेक पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर झालेल्या संशोधनानंतर या आजारावर लस उपलब्ध झाली असून लंम्पी आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी लंम्पी आजारावरील लस देखील उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नितीन फुके यांनी दिली.
Nagpur News: ‘जर्मन शेफर्ड’ खरंच शिकारीसाठी वापरला जातो का? तुम्हाला माहिती नसेल पण…
गाई म्हशी आणि इतर मोठ्या जनावरांप्रमाणेच शेळ्या मेंढ्या आणि बकऱ्यांमध्ये देखील पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आजार उद्भवत असतात. यात लहान जनावरांसाठी देखील मान्सून पूर्व लसीकरण करणे आवश्यक आहे. बकऱ्यांमध्ये आंत्रविषार या आजाराने देखील बकरी दगावतात म्हणून म्हणून पशुपालकांना आंत्रविषार या आजारावर प्रतिबंधक लस देणे आवश्यक आहे. या सर्व लसी शासकीय पशु दवाखान्यात अगदी नाममात्र शुल्क आकारून पशूंना देण्यात येते. तरी सर्व पशुपालकांना आवाहन आहे की त्यांनी आपल्या पशूंच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व लसीकरण करून घ्यावे ,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नितीन फुके यांनी केले.