चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर, 8 मार्च : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील अनेक महापालिकांची मुदत संपल्यानं प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहेत. सध्या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात तीन सुनावण्या सुरू आहेत, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत कोणीही निवडणुका जाहीर करू शकत नाही. हे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येत नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दरम्यान यावेळी त्यांनी उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्या राज्याचा अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प असून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील जनतेची मतं , सूचना आणि सल्ले घेऊन राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. अर्थसंकल्पाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल. ठाकरे गटाला टोला काही दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला टोला लगावला आहे. रस्त्यावर राडे हाणामारी करण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून होत आहे. संदीप देशपांडे यांच्या बयानमधूनही तेच समोर आले आहे. नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आणि टोमण्यांमुळे जनता कंटाळली आहे. आता मनभेद आणि मतभेद दूर करून राज्याच्या विकासासाठी कमा केलं पाहिजे असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.