विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 3 जून : आपलं लग्न हे इतरांपेक्षा हटके आणि अविस्मरणाी व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. लग्न हे केवळ दोन जीवांचे किंवा कुटुंबांचेच नव्हे तर दोन विचारांचंही मिलन असतं. प्रत्येक जण आपल्या धर्मातील पद्धतीनुसार कुटुंबीय आणि जवळच्या मंडळीच्या उपस्थितीमध्ये परमेश्वराच्या साक्षीनं विवाहबद्ध होतात. भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी येथे झालेल्या एका लग्नात जोडप्यानं नवा आदर्श सर्वांसमोर ठेवलाय. संविधान आहे साक्षीला… भंडारा जिल्ह्यातल्या लाखणी तरूणी प्रांजल बडोले आणि अमरावती जिल्ह्यातल्या पंकज धनराज पाटील यांचा विवाह नुकताच झाला. त्यांनी यावेळी संविधानाला साक्षी मानत लग्न करण्याचा निश्चय केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेबद्दल सर्वांमध्ये जागृती निर्माण हा त्यांचा हेतू होता. व्यवसायानं पत्रकार असलेल्या या जोडप्यानं त्या पद्धतीनं लग्न करत सर्वांसमोर आदर्श ठेवलाय.
प्रांजल आणि पंकज यांनी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करत लग्नाच्या विधीला सुरूवात केली. चांगले कर्म आणि आचरण करण्याचा त्यांनी यावेळी संकल्प केला. बाबासाहेबांनी व्ही.एस. कर्डकांना आदर्श बौध्द विवाह समारंभ कसा असावा यासंदर्भात 4 डिसेंबर 1956 मध्ये पत्र लिहिलं होतं. त्याच पत्राचं अनुकरण करत त्यांनी लग्न केलं. लग्नसमारंभात पाहुण्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या युक्ती केल्या जातात. प्रांजल यांनी हातात राज्यघटनेची प्रत घेत मंडपात एन्ट्री केली आणि सर्वांचं लक्ष वेधलं. लग्नाच्या माध्यमातून सामाजिक जागृती करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सातजन्मी अशी बायको नको, चक्क पुरूषांनी साजरी पौर्णिमा, असं का केलं? Video काय होता उद्देश? ‘संपूर्ण जगात भारत देश हा सर्वार्थाने सुंदर असा देश आहे. संविधानाला सर्वस्व मानून देशाची यशस्वी वाटचाल सुरूय. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच संविधानात समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा समावेश केलाय. ही मुल्य समाजात प्रस्थापित व्हावी असा आमच्या लग्नसोहळ्याचा मुख्य उद्देश होता. आमचा कोणत्याही प्रथा, परंपरा किंवा धर्माला विरोध नाही. आपला देश ज्या संविधानाच्या आधारावर चालतो त्याच पवित्र ग्रंथाच्या साक्षीनं विवाहबद्ध व्हावं असा आम्ही विचार केला आणि तो अंमलात आणला,’ असं मत पंकज पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.