एसटीचा धक्कादायक व्हिडीओ
गडचिरोली, 28 जुलै, महेश तिवारी : गडचिरोलीतील अहेरी बस आगाराच्या छप्पर फाटलेल्या लाल परीचा व्हिडिओ सध्या राज्यभर तुफान गाजत आहे. आता याच आगाराच्या आणखी एका बसचा व्हिडीओ समोर आला आहे. भर पावसात बसचा वायफर बंद झाल्याने एका हाताने स्टेरिंग आणि एका हाताने वायफर फिरवण्याची वेळ चालकावर आल्याचं या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे अहेरी आगारातील भंगार बस गाड्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. अहेरी आगाराची ही बस प्रवाशांना घेऊन आसरअल्लीवरून अहेरीकडे निघाली होती. मात्र वाटेतच मुसळधार पाऊस सुरू झाला.
मुसळधार पावसात बसच्या वायफरमध्ये बिघाड झाला. वायफर काम करत नसल्यानं एसटीच्या समोरच्या काचेवर पाणी साचण्यास सुरुवात झाली. गाडी चालवण्यात अडथळा निर्माण होत असल्यानं अखेर चालक एका हातात बसचं स्टेअरिंग तर दुसऱ्या हातानं वायफर फिरवत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.