फाईल फोटो
अमरावती, 12 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. आर्थिक फसवणुकीचेही प्रकारही सातत्याने समोर येत आहेत. यातच आता अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कापूस खरेदीत तब्बल 50 लाखांनी फसवणूक झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमरावतीमध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण बातमी - कापसाला अधिक भाव देण्याची बतावणी करून तीन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची तब्बल 50 लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी धारणी पोलिसांनी 12 फेब्रुवारी रोजी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद मोहसीन (वय-20), अर्जुन सानू पटोरकर (वय-25) व मोईन खान वसीम खान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 500 क्विंटल कापूस खरेदी केला - सध्या बाजारात कापसाचा प्रति क्विंटल दर 7500 रुपये इतका आहे. मात्र, आरोपींनी धारणी येथील रामलाल कासदेकर आणि अन्य शेतकऱ्यांचा कापुस 9 ते 10 हजार रुपयांनी घेण्याची लालूच दाखविली. त्यामुळे अधिक दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस त्यांना दिला. याप्रकारे आरोपींनी तब्बल 50 लाख रुपये किमतीचा सुमारे 500 क्विंटल कापूस खरेदी केला. हेही वाचा - Instagramवर चॅटिंगनंतर दीड वर्ष चाललं प्रेमप्रकरण, Valentines Weekमध्ये प्रियकरासोबत घडलं भयानक यानंतर 13 जानेवारीपासून त्या आरोपी व्यापाऱ्यांनी तो गोरखधंदा चालविला. मात्र, पैसे देण्याची वेळ येताच हात वर केले. यानंतर आरोपींनी तेथून पोबारा केली. याप्रकरणी आपली फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यावर शेतकरी रामलाल कासदेकर यांनी शनिवारी धारणी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.